चीनमधील खड्डेमय रस्त्याचा व्हिडियो नगर-मनमाड रोड म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

खड्डेमय रस्ते तसे भारतासाठी नवे नाहीत. परंतु, अशाच एका रस्त्याचा व्हिडियो नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्याच्या मधोमध पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये वेगवान वाहने आदळत असल्याचा हा 30 सेकदांचा व्हिडियो नगर-मनमाड रोडवरील आहे, असा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो चीनमधील असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकअर्काइव्हअर्काइव्ह

हाच व्हिडियो मुंबईचा म्हणूनही व्हायरल होत आहे.

(Archive)

तथ्य पडताळणी

निरीक्षण केल्यावर लगेच दिसते की, व्हिडियोमध्ये चीनी भाषेतील मजकूर दिसतो. महाराष्ट्रातील एखादा व्हिडियो चीनी भाषेतील वेबसाईटवरून घेऊन तो सोशल मीडियावर का कोणी शेयर करेल? यामुळे व्हिडियोबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्याबद्दल शंका निर्माण होते.

शंकानिरसणासाठी व्हिडियोतील की-फ्रेम निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून चीनमधील काही वेबसाईट्सच्या लिंक आढळल्या. चीनमधील ‘बिलीबिली’ नावाच्या एका लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाईटवर “Brother Xiaoqiang 123” नावाच्या युजरने हा व्हिडियो शेयर केला होता. तो अधिक लांबीचा आणि चांगल्या क्वालिटीचा आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – BiliBili

सदरील युजरच्या अकाउंटची तपासणी केल्यावर लक्षात येते की, तो केवळ खराब रस्त्यांचे व्हिडियो शेयर करतो. त्याने त्याच्या फॉलोवर्सना दयनीय रस्त्यांची माहिती देण्याची विनंती केली आहे. तो स्वतः तेथे जाऊन रस्त्यांची दूरवस्था चित्रित करून सोशल मीडियावर टाकतो आणि ती समस्या सर्वांसमोर मांडतो.

याच जागेवरील अनेक व्हिडियो तो जून महिन्यापासून शेयर करीत आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – BiliBili

व्हायरल व्हिडियोमध्ये बारकाईने पाहिले तर वाहने उजव्या बाजूने चालत आहेत. भारतात गाड्या डाव्या बाजूने चालतात. तसेच रस्त्यापलीकडील इमारतीवर आणि वाहनांवर चीनी भाषेतून मजकूर लिहिलेला आहे. 

बिलीबिली वेबासाईटवरील व्हिडियोच्या खाली हजारो कमेंटचा गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने वाचन केल्यावर लक्षात आले की, हा व्हिडियो चीनमधील गुआंगझोऊ भागातील बैयुन जिल्ह्यातील शिजिंग अव्हेन्यू येथील आहे. गुआंगझोऊ ही दक्षिण चीनमधील गुआंगडाँग प्रांताची राजधानी आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडियो नगर-मनमान रोड किंवा मुंबईचा तर नाहीच; तो भारतातीलसुद्धा नाही. खड्डेमय रस्त्याचा हा व्हिडियो चीनमधील आहे. यापूर्वी हा व्हिडियो गुजरातमधील म्हणून व्हायरल झाला होता. फॅक्ट क्रेसेंडोने या आधी इंग्रजी आणि गुजरातीमध्ये या व्हिडियो फॅक्ट चेक केले होते.

(वाचकांना जलद आणि अचूक माहिती देण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने सुरू केली आहे चॅटबॉटची सुविधा. 9049053770 हा क्रमांक सेव्ह करा आणि पाठवा तुमची फॅक्ट-चेक रिक्वेस्ट.)

Avatar

Title:चीनमधील खड्डेमय रस्त्याचा व्हिडियो नगर-मनमाड रोड म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False