FAKE NEWS: लॉकडाऊनला विरोध करताना संतप्त जमावाने पोलिसांना मारले का?

Coronavirus False

संतप्त जमाव एका पोलिसाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी जमलेल्या जमावाने हा हल्ला केला. सदरील व्हिडिओ काही जण बीडमधील म्हणून तर काही नांदेडमधील म्हणून शेअर करीत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. तसेच पोलिसाला मारहाण होण्यामागचे कारणही वेगळे आहे.

काय आहे दावा?

व्हायरल क्लीपमध्ये संतप्त जमाव एका पोलिसाला बेदम मारताना दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, बीड/नांदेड येथे लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांनी पोलिसांना मारले. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरत आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह

मग हा व्हिडिओ खरंच महाराष्ट्रातील एखाद्या शहरातील आहे का?

तथ्य पडताळणी

गुगल कीवर्ड्सच्या सहाय्याने शोध घेतल्यावर कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. हा व्हिडिओ कर्नाटकमधील म्हैसूर शहरातील आहे.

सर्वप्रथम आम्हाला साहिल ऑनलाईन टीव्ही न्यूजच्या युट्यूब अकाउंटवर सदरील व्हिडिओ आढळला. सोबतच्या माहितीनुसार, मारहाणीची ही घटना 22 मार्च रोजी म्हैसुर शहरात घडली. रस्त्यावर पोलिस तपासणी करीत असताना एक दुचाकी त्यांना पाहून माघारी फिरली आणि तिचा अपघात झाला. त्यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या जमावाने वाहतूक शाखेतील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.

‘द न्यूज मिनिट’ आणि ‘म्हैसुर टुडे’ यांच्या बातम्यांनुसार, मृत चालकाचे नाव देवराज (47) होते. तो आणि त्याचा सागर नावाच मित्र असे दोघे दुचाकीवर चालले होते. म्हैसुरमधील रिंग रोड येथे त्यांची गाडी घसरून त्यांचा अपघात झाला. आसपास जमलेल्या लोकांनी आरोप केला की, पोलिसांमुळे त्यांचा अपघात आणि चालकाच्या मृत्युचा त्यांच्यावर ठपका ठेवत पोलिसांना मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हैसुर पोलिसांनी खुलासा केला की, हा अपघात दुचाकीची एका ट्रकशी धडक झाल्यामुळे झाला. त्याला पोलिस जबाबदार नाहीत. या ट्रकचालकाविरोधात गुन्हादेखील करण्यात आला.

जखमी झालेल्या सुरेशनेसुद्धा व्हिडिओद्वारे माहिती दिली की, अपघातामध्ये पोलिसांची काहीच चूक नाही. रस्त्यावरील बारीक खडीमुळे गाडीचा तोल गेला आणि ट्रकला धडक बसली.

फॅक्ट क्रेसेंडो गुजरातीने म्हैसुरचे पोलिस अधीक्षक सी. बी. ऋषीयांत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल होत असलेला दावा खोडत सांगितले की, हा व्हिडिओ म्हैसुर शहराती आहे. या प्रकरणी पीडित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ बीड किंवा नांदेडमधील नाही. हा व्हिडिओ कर्नाटकमधील म्हैसुर शहरातील आहे. तसेच पोलिसांना मारहाणीचे कारण लॉकडाऊन नसून, अपघातामध्ये दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत मानून जमावाने त्यांच्यावह हल्ला केला होता.

Avatar

Title:लॉकडाऊनला विरोध करताना संतप्त जमावाने पोलिसांना मारले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False