अजय देवगणला दिल्लीत शेतकऱ्यांनी मारहाण केली नाही; जाणून घ्या ‘त्या’ व्हिडिओचे सत्य

False सामाजिक

दोन गटांमधील भांडणाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अभिनेता अजय देवगणला शेतकऱ्यांनी दिल्लीत बेदम मारहाण केली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या व्हिडिओतील व्यक्ती अजय देवगण नाही.

काय आहे दावा?

सुमारे पाच मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळासह जोरदार भांडण सुरू असल्याचे दिसते. सोबत कॅप्शनमध्ये दावा केला जात आहे की, शेतकऱ्याची भूमिका करून कोट्यवधी रूपये मिळवणाऱ्या अजय देवगणने शेतकरी अंदोलनाविषयी सहानुभूती दाखवली नाही. पण या आंदोलना विरोधात ट्विट करून गरळ ओकली! त्यामुळे शेतकरी पुत्रांनी खरोखरची फायटींग करून अजय देवगणला तुडवला.

(सूचना – व्हिडिओत शिवराळ भाषा वापरण्यात आलेली आहे)

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्हफेसबुक 

तथ्य पडताळणी

याच महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण यांची गाडी एका शेतकरी आंदोलन समर्थकाने रोखली होती. त्यानंतर आता अजय देवगण यांना शेतकऱ्यांकडून दिल्लीमध्ये मारहाण झाली का हे तपासणे गरजेचे आहे. 

गुगल कीवर्ड्स सर्चद्वारे ‘इंडिया टुडे’ने या व्हिडिओबाबत केलेली एक बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, सदरील घटना शुक्रवारी रात्री दिल्लीतील एअरोसिटी येथे घडली होती. दोन व्यक्तींच्या कारची एकमेकांना टक्कर झाल्यामुळे हे भांडण झाले होते. बातमीत कुठेही अजय देवगण यांच्या उल्लेख केलेला नाही.

‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची नावे तरणजीत सिंग (वय 31, रा. जनकपुरी) आणि नवीन कुमार (वय 29, रा. चावला) अशी आहेत.

सिंग आणि कुमार एअरोसिटी येथून जेवून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या गाड्यांची एकमेकांना टक्कर बसली. यावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण पेटले. 

मूळ बातमी – एनडीटीव्ही

‘टाईम्स नाऊ’ वाहिनीच्या बातमील उत्तर देताना दिल्ली विमानतळाच्या पोलिस उपायुक्तांनी ट्विट करून माहिती दिली की, दिल्ली विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांतील लोकांना अटक करण्यात आलेली आहे. सदरील प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अजय देवगण यांचा खुसाला

अजय देवगणच्या नावाने मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून खुलासा की, या व्हिडिओतील व्यक्ती ते नाहीत. विशेष म्हणजे, अजय देवगण गेल्या 14 महिन्यांपासून दिल्लीला गेलेला नाही.

“तानाजी चित्रपटानंतर जानेवारी 2020 पासून अजय देवगण दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे अजय देवगण यांनी दिल्लीत मारहाण झाल्याचे वृत्त खोटे आहे. अजय देवगण सध्या मुंबईत विविध चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे प्रसिद्ध पत्रकामध्ये म्हटले आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, अजय देवगणच्या नावाने फेक दावा व्हायरल होत आहे. दिल्लीतील मारहाणीच्या व्हिडिओत अजय देवगण नाही. कार अपघातावरून दोन गटांमध्ये ते भांडण झाले होते. त्यामुळे ‘शेतकऱ्यांनी अजय देवगणला मारहाण केली’ हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:अजय देवगणला दिल्लीत शेतकऱ्यांनी मारहाण केली नाही; जाणून घ्या ‘त्या’ व्हिडिओचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False