पुणे-हिंजवडीत कारवर होर्डिंग पडुनही कोणीच जखमी कसे झाले नाही? काय आहे त्यामागील कारण?

दिशाभूल करणाऱ्या I Misleading सामाजिक

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील एक मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. होर्डिंगच्या लोखंडी ढाच्याखाली अडकलेल्या कारचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, टाटा नेक्सॉन कारच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना काहीच इजा झाली नाही.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धवट माहिती देणारी आढळली. या गाडीतील प्रवासी जखमी झाली नाही कारण होर्डिंग पडले तेव्हा गाडीत कोणीच नव्हते.

तथ्य पडताळणी

लाल रंगाच्या कारवर होर्डिंग कोसळल्याचा फोटो शेअर करून म्हटले की, आज हिंजवडीत एक घडलेली घटना. रोडच्या बाजुचे होर्डिंग्ज गाडीवर पडले. गाडीचे नुकसान झाले. पण, आतील कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. याला म्हणतात. “टाटांचा विश्वास” सर्वश्रेष्ठ उत्पादन. हि गाडी आहे “NEXON”.

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तपासले की, अशी घटना घडली का. त्यानुसार कळाले की, हिंजवडी परिसरात 22 मार्च रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक फ्लेक्स फाटले. फेज दोन मधील मुख्य रस्त्यावर एक मोठे होर्डिंग कोसळल्याने त्याखाली एक चारचाकी आणि अनेक दुचाकी अडकून पडल्या होत्या.

अधिक माहिती घेतल्यावर पुणेकर न्यूज वेबसाईटवरील या घटनेची बातमी आढळली. यामध्ये म्हटले  की, विप्रो सर्कल जवळ दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली होती. बातमीत स्पष्ट म्हटले आहे की, होर्डिंग कोसळले तेव्हा गाडीत कोणीच नव्हते. दुचाकीवरील चालकदेखील पाऊस सुरू असल्यामुळे गाडी थांबवून बाजुच्या दुकानात उभा होता. म्हणजे हा अपघात झाला तेव्हा दोन्ही वाहनांमध्ये कोणीच नव्हते. 

मूळ बातमी – पुणेकर न्यूज

या घटनेची अधिकृत माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने हिंजवडी फेज-2 येथील अग्निशामक दलाशी संपर्क केला. तेथील इनचार्ज सुनील इंगावले यांनी माहिती दिली की, “आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. होर्डिंग कोसळले तेव्हा कारमध्ये कोणीच नव्हते. कारमधील प्रवासी बाजुच्या हॉटेलमध्ये बसलेले होते. त्यामुळे या घटनेत कोणीच जखमी झाले नाही.”

यानंतर आम्ही हिंजवडी पोलिस ठाण्याशी संपर्क केला. घटनास्थळी भेट दिलेल्या हवालदार शंकर उत्तेकर यांनी माहिती दिली की, “जेथे ही घटना घडली तेथे मोकळी जागा आहे. जोराचा पाऊस सुरू झाल्यामुळे लोक रस्त्यावर वाहने उभे करून बाजुला गेले होते. सदरील कारमधील व्यक्ती चहा पिण्यासाठी बाजुच्या हॉटेलमध्ये बसलेले असताना होर्डिंग त्यांच्या कारवर पडले.”

शेवटी आम्ही या कारचे मालक अनिश सप्रे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, रस्त्यावर कार उभी करून मी बाजुच्या हॉटेलमध्ये गेलो होतो. तेवढ्यात वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे मी गाडीकडे परत जाऊ शकत नव्हतो. माझ्या नजरेसमोर हे होर्डिंग माझ्या गाडीवर पडले.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पुण्यातील हिंजवडी येथे कारवर होर्डिंग पडले तेव्हा कारमध्ये कोणीच नव्हते. त्यामुळे कारच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांचा जीव वाचला, असा दावा करणे चुकीचे आहे. म्हणून ही पोस्ट अर्धवट माहिती देणारी ठरते.

Avatar

Title:पुणे-हिंजवडीत कारवर होर्डिंग पडुनही कोणीच जखमी कसे झाले नाही? काय आहे त्यामागील कारण?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Misleading