कोथिंबिरीतून 12.5 लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

केवळ चार एकरामध्ये कोथिंबिरीसारख्या पिकातून साडेबारा लाखांचे उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामधील नांदूरशिंगोटे गावातील विनायक हेमाडे या शेतकऱ्याची ही यशोगाथा शेयर करताना अनेकांनी डोक्यावर नोटांचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेयर केला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या फोटोची पडताळणी करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, हा फोटो विनायक हेमाडे यांचा नाही.

काय आहे दावा?

डोक्यावर पैशांचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेयर करून लिहिले की, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या चार एकर कोथिंबिरीच्या पिकाला 12 लाख 51 हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे!

इतरांनी लिहिले की, पिकाला एवढा भाव मिळाल्यानंतर विनायक यांची ही समाधानी भावमुद्रा सर्व काही सांगून जाते.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्हफेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर याबाबतीत शोध घेतला असता कळाले की, नांदुरशिंगोटे (ता. सिन्नर, जि. नाशिक) गावातील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या कोथिंबिरीची नुकतीच साडेबारा लाखांमध्ये विक्री झाली होती. 

‘लोकमत’च्या बातमीनुसार, हेमाडे यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार एकरवर हायब्रिड कोथिंबिरीची लागवड केली होती. ही कोथिंबीर मार्केटला न नेता त्यांनी जागेवरच विक्री करण्याचा निर्णय घेतला. दापूर येथील भाजीपाला व्यापारी शिवाजी दराडे यांनी कोथिंबीर पिकाची पाहणी करुन चार एकरातील कोथिंबिरीचा सौदा साडेबारा लाखांना पक्का केला. 

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

लोकमतच्या बातमीमध्ये विनायक हेमाडे यांचा जो फोटो दिला आहे तो सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोपेक्षा वेगळा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट विनायक हेमाडे यांच्याशीच संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, डोक्यावर पैशांचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो त्यांचा नाही. त्यांच्या नावे वेगळाच फोटो शेयर होत असून, लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

“सोशल मीडियावर पसरत असलेला फोटो माझा नाही. तो फोटोजर नीट पाहिला तर त्यातील नोटा या जुन्या आहेत. म्हणजे तो फोटो अलिकडचासुद्धा नाही. कोणीतरी खोडसाळपणे माझ्या बातमीसह तो शेयर केला आणि लोकांनी त्याला खरे मानले,” असे हेमाडे म्हणाले.

विनायक हेमाडे यांनी फॅक्ट क्रेसेंडोला त्यांच्या कुटुंबाचा फोटोदेखील पाठवला.

कोथिंबिर लागवडीमागचे कारण सांगताना ते म्हणाले की, “यंदा मुंबईसह महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला. हे लक्षात घेऊन मार्केटचा अंदाज काय असेल याचा विचार केला. त्यानुसार, मग टप्प्याटप्प्याने कोथिंबिर लावली. आधी अडीच एकर मग हळूहळू क्षेत्र वाढवत गेलो. पहिल्या लॉटमध्ये दीड एकरात अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या लॉटमध्ये चार एकरात 12 लाख 51 हजार रुपये भाव मिळाला.”

विनायक हेमाडे यांचा मूळ फोटो आणि नोटांचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो यांची तुलना खाली केली आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, कोथिंबिरीतून साडेबारा लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या विनायक हेमाडे या शेतकऱ्याच्या नावे वेगळाच फोटो व्हायरल होत आहे. डोक्यावर पैशांचे गाठोडे घेऊन जातानाचा तो फोटो विनायक हेमाडे यांचा नाही.

Avatar

Title:कोथिंबिरीतून 12.5 लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •