काय आहे केवळ एका महिन्यासाठी प्रकट होणाऱ्या चमत्कारीक नदीच्या व्हिडिओचे सत्य?

False सामाजिक

नदीपात्रामध्ये पाणी वाहतानाचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, दक्षिण भारतातील ही एक चमात्कारिक नदी. केवळ पितृपक्षाच्या अमावस्येला ही नदी प्रकट होते आणि दीपावलीच्या अमावस्येला विलीन होते. केवळ एक महिनाच प्रवाहित राहणाऱ्या या कथित नदीविषयी सोशल मीडियावर कुतूहल आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची पडताळणी केली असता, हे दावे खोटे असल्याचे समोर आले. वाचा काय आहे या व्हिडिओचे सत्य.

काय आहे दावा?

दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही लोक नदीपात्रात पाणी आल्यावर त्याला नमन करताना दिसतात. सोबत कॅप्शन दिली आहे की, “दक्षिण भारतातील ही नदी पितृ पक्ष मध्ये अमावस्या ला प्रकट होती आणि दीपावली मध्ये अमावस्याला गुप्त होती.

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ कुठला आहे हे शोधले. की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर युट्यूबवर 20 सप्टेंबर 2017 साली अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळला. त्यासोबत दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमधील मयावरम या गावात कावेरी नदीचे पाणी आले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. 2017 या वर्षी प्रथमच गावातील पात्रामध्ये पाणी आल्यामुळे गावकऱ्यांनी नदीचे दर्शन घेतले.

ट्विटरवरदेखील 2017 साली अनेकांनी याच माहितीसह हा व्हिडिओ शेयर केला होता. 

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता कळाले की, तमिळनाडूतील माईलाडुथुरई या शहरालाच मयावरम या नावाने ओळखले जाते. माईलाडुथुरई शहरात 2017 साली 12 ते 24 सप्टेंबर दरम्यान ‘कावेरी महापुष्करम’ हा उत्सव साजरा करण्यात आला होता.

तमिळनाडूमध्ये ‘कावेरी महापुष्करम’ हा उत्सव दर 12 वर्षांनी साजरा केला जातो. या 12 दिवसीय उत्सवामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतातील लाखो भाविक कावेरी नदीचे आभार मानण्यासाठी श्रीरंगम आणि माईलाडुथुरई येथे जमतात. 

‘डेक्कन क्रोनिकल्स’ आणि ‘द हिंदू’च्या बातमीनुसार, त्या वर्षी नदीपात्र कोरडेठाक पडले होते. त्यामुळे या उत्सव समितीने तमिळनाडू सरकारकडे जवळच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार, सरकारने पात्रामध्ये पाणी सोडले होते. हा त्याचा व्हिडिओ आहे.

निष्कर्ष

यावरून हे कळते की, एक तर हा व्हिडिओ या वर्षीचा नाही. तो तीन वर्षे जूना आहे. दुसरे म्हणजे ही काही चमत्कारिक नदी नाही. तमिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या उत्सवानिमित्त सरकारने भाविकांच्या मागणीनुसार कोरड्यापात्रात धरणातून पाणी सोडले होते. दक्षिण भारतात कावेरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्याबाबत असे खोटे दावे पसरवू अथवा त्यावर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:काय आहे केवळ एका महिन्यासाठी प्रकट होणाऱ्या चमत्कारीक नदीच्या व्हिडिओचे सत्य?

Fact Check By: Milina Patil 

Result: False