उस्मानाबादचे माजी नगरसेवक विशाल साखरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे का?

False राजकीय | Political

उस्मानाबादचे माजी नगरसेवक आणि वकील विशाल साखरे यांच्या विषयी एक पोस्ट सोशल मीडियावर आहे. या पोस्टमध्ये विशाल साखरे यांच्या परिवाराबद्दल लिहिले असून, विशाल साखरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असे म्हटले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

फेसबुकवर असणाऱ्या पोस्टमध्ये विशाल साखरे हे नगरसेवक आहेत असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे ते दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आणि व्यवसायाने वकील आहेत असे म्हटले आहे. संपुर्ण पोस्टमध्ये विशाल साखरे यांच्या पुर्ण परिवारावर आक्षेपार्ह भाषेमध्ये विविध आरोप लावले आहेत. त्याशिवाय विशाल साखरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे असे म्हटले आहे.

पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेले विशाल साखरे यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडोने सर्वात प्रथम गुगलवर उस्मानाबाद नगर परिषद असे सर्च केले. त्यानंतर उस्मानाबाद नगर परिषद कार्यालयात फोनवर संपर्क साधल्यावर असे कळाले की विशाल साखरे हे वर्तमान परिस्थितीत उस्मानाबादचे माजी नगरसेवक आहेत. तसेच ते वकील आहेत ही माहिती कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

त्यानंतर आम्ही उस्मानाबाद माजी नगरसेवक विशाल साखरे यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर संपर्क केला.

  • विशाल साखरे उस्मानाबादचे नगरसेवक आहेत का?

विशाल साखरे हे उस्मानाबाद शहराचे 2011 ते 2016 या काळात नगरसेवक म्हणून काम करत होते. सध्या वर्तमान काळात ते गुन्हेगारी विषयक वकील म्हणून काम करतात. व्यवसायाने ते वकील आहेत. त्यामुळे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेले पद हे भूतकाळातील आहे. विशाल साखरे हे माजी नगरसेवक आहेत.

  • विशाल सारखे हे पत्रकार म्हणून काम करतात का?

विशाल साखरे यांचे बंधू हे दैनिक पुण्यनगरीसाठी काम करतात. परंतू ते पत्रकार म्हणून काम पाहत नाहीत. विशाल साखरे हे कोणत्याही दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम पाहत नाहीत.

  • विशाल साखरे यांच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का?

विशाल साखरे यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात त्यांनी स्वतःवर कोणताही गुन्हा नोंद नाही अशी माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या नावाने आणि त्यांच्या परिवाराबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह भाषेमध्ये सोशल मीडियावर पोस्ट पसरविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. बनावट नावानेही अशा पोस्ट फिरविण्यात येत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.  

सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह भाषेमध्ये त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल ज्या पोस्ट पसरविण्यात येत आहेत यासंदर्भात उस्मानाबाद पोलिस स्टेशनमध्ये तसेच सायबर सेल या विभागात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

विशाल साखरे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट बद्दल उस्मानाबाद येथील आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. 11/04/2019 या तारखेला नोंदवलेल्या तक्रारीमध्ये भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम कलम 499, 500, 506, 354 अंतर्गत प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आलेला आहे. याविषयी महाराष्ट्र पोलीस ऑनलाईन एफआयआर या वेबसाईटवर 0106/2019 या नंबरचे एफआयआर आपण पाहू शकता.

आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये फॅक्ट क्रिसेंडोने अशा प्रकारची कोणती तक्रार दाखल करण्यात आली आहे का हे तपासले. त्यानंतर आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी माजी नगरसेवक विशाल साखरे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या विषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी आक्षेपार्ह भाषेत पोस्ट पसरविण्यात येत आहे यासाठी तक्रार नोंदवली आहे या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच यासंदर्भात त्यांनी सांगितले की उस्मानाबाद सायबर सेल विभागाने या पोस्ट विषयी फेसबुक कंपनीला पत्र-व्यवहार केला आहे. पुढील तपास सुरू आहे. तसेच माजी नगरसेवक विशाल साखरे यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हरिभाऊ खाडे,
पोलीस निरीक्षक,
आनंद नगर पोलीस स्टेशन,
उस्मानाबाद.

विशाल साखरे यांच्यासंदर्भातील सोशल मीडियावर असणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

दैनिक लोकमतअर्काईव्ह

दैनिक पुण्यनगरीअर्काईव्ह

दैनिक सकाळअर्काईव्ह

निष्कर्ष : संपुर्ण तपासाअंती असे निदर्शनात आले की, उस्मानाबाद माजी नगरसेवक विशाल साखरे यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेले विशाल साखरे हे पत्रकार म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे अशी पोस्ट जाणीवपूर्वक विशाल साखरे यांच्या आणि त्यांच्या परिवाराबद्दल पसरविण्यात येत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये विशाल साखरे यांच्यावर गुन्हा दाखल हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:उस्मानाबादचे माजी नगरसेवक विशाल साखरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False