
कोरोनाविषीय सोशल मीडियावर फेक बातम्या शेयर केल्याबद्दल शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोविड-19 या महारोगाच्या जागतिक साथीने आधीच हैराण असताना त्यात फेक न्यूजच्या तडक्याने प्रशासनाचे काम अधिक कठीण झाले आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट पोलिसांनी व्हॉट्सअॅप वापरण्याची काही नियमही घालून दिलेले आहेत.
अशाच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप टिकसंदर्भात एक जूना मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये जर मेसेजखाली तीन लाल टिक्स आल्या तर समजावे की, शासनाने तुमचा मेसेज वाचला आहे आणि तुमच्यावर लवकरच कारवाई होईल, असा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज खोटा असल्याचे कळाले.
काय आहे मेसेजमध्ये?
मेसेजमध्ये म्हटले जाते की:
१. ✔= संदेश पाठविला
२. ✔✔= संदेश पोहचला
३. दोन निळ्या ✔✔= संदेश वाचला
४. तीन निळ्या ✔✔✔= शासनाने संदेशाची नोंद घेतली
५. दोन निळ्या व एक लाल ✔✔✔= शासन तुमच्या विरूध्द कारवाई करू शकते
६. एक निळी व दोन लाल = शासन तुमची माहिती तपासत आहे
७. तीन लाल ✔✔✔= शासनाने तुमच्या विरूध्द कारवाई सुरू केली असून लवकरच तुम्हाला न्यायालयाचे समन्स येईल.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या मेसेजमधील माहितीत काही तथ्य आहे का याविषयी व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवर तपासणी केली. मेसेजखाली दिसणाऱ्या टिक मार्कचा अर्थ काय असतो याविषयी येथे माहिती दिलेले आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅपमध्ये केवळ तीन प्रकारचेच टिक मार्क असतात: सिंगल ग्रे टिक, डबल ग्रे टिक आणि डबल निळे टिक. या व्यतिरिक्त कोणतेही टिक मार्क व्हॉट्सअॅपमध्ये नसतात. व्हॉट्सअॅपमध्ये ना तीन टिक मार्क असताता आणि ना लाल रंगाचे टिक मार्क असतात.
तुम्ही जेव्हा मेसेज पाठवता तेव्हा ग्रे रंगाचा एक टिक मार्क दिसतो. त्याचा अर्थ होतो की, तुमच्या मोबाईलमधून मेसेज सेंड (Send) झाला.
तुमचा मेसेज जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे पोहचतो, तेव्हा दोन ग्रे रंगाचे टिक मार्क दिसतात.
हे दोन्ही टिक जेव्हा निळे होतात, तेव्हा समजावे की, समोरच्या व्यक्तीने तो मेसेज वाचला आहे.

मूळ माहिती येथे वाचा – व्हॉट्सअॅप
मग सरकार आपले व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकते का?
या प्रश्नाचे उत्तरः “नाही”
व्हॉट्सअॅपमध्ये End-To-End Encryption प्रणालीमुळे मेसेज सुरक्षित असतात. या सुरक्षा प्रणालीमुळे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येणारे मेसेज केवळ पाठविणाऱ्याला आणि तो मेसेज ज्याला पाठवला केवळ त्यांनाच वाचता येतो. त्यामुळे हॅकर्स, सरकारी यंत्रणा आणि स्वतः व्हॉट्सअॅपसुद्धा यूजर्सचे मेसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेला मेसेज कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह केला जात नाही. तो थेट ज्याला पाठवला आहे त्याला पोहचविला जातो. म्हणजे आपला आणि समोरच्याचा मोबाईल व्यतिरिक्त मेसेज कुठेही स्टोर केला जात नाही.
याविषयी अधिक सविस्तर येथे वाचा – WhatsApp Security । End-To-End Encryption
सोशल मीडियावर तीन लाल टिक संदर्भातील मेसेज व्हायरल झाल्यानंतर केंद्रच्या पत्र सूचना विभागानेसुद्धा ट्विटरवर खुलासा करीत हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. “व्हॉट्सअॅपवरील टिक मार्क संदर्भात जो मेसेज फिरत आहे तो पूर्णतः निराधार आहे. सरकार अशाप्रकारे नागरिकांचे मेसेज वाचत नाही,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
निष्कर्ष
थोडक्यात काय तर व्हॉट्सअॅप यूजर्समध्ये होणारी मेसेजची देवाण-घेवाण केवळ त्यांनाच वाचता येते. खुद्द कंपनीलाही हे मेसेज वाचण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर सरकारलाही हे मेसेज वाचता येत नाही. व्हॉट्सअॅपमध्ये तीन टिक मार्क किंवा लाल टिक मार्क नसतात. तसे सांगणारा फेक मेसेज आहे. परंतु, याचा अर्थ हा नाही की, खोट्या बातम्यां फॉरवर्ड करून शकता. कोरोना किंवा सामाजिक सौहार्द भंग करणारे मेसेज पाठवले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोविड-19 साथीच्या काळात “सोशल मीडिया डिस्टन्सिंग” पाळले पाहिजे.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:व्हॉट्अॅपमध्ये तीन लाल टिक मार्कचा अर्थ काय होतो? सरकार आपले मेसेज वाचू शकते का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
