कोरोना रुग्णांचे मृतदेह समुद्रात फेकण्यात येत नाहीत. तो व्हिडियो लिबियातील स्थलांतरितांचा आहे. वाचा सत्य

Coronavirus False

समुद्रकिनारी वाहून आलेल्या मृतदेहांचा व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना समुद्रात फेकून देण्यात येत आहे. त्याआधारे पुढील काही दिवस समुद्रातील मासे न खाण्याचेही आवाहनदेखील सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्याचे आवाहन केले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये समुद्रातून वाहत वाहत किनाऱ्यावर आलेले मृतदेह दिसतात. आरोग्य कर्मचारी या मृतांना मग उचलतात. सोबत मेसेजमध्ये म्हटले की, “कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांना अशाप्रकारे समुद्रात फेकून देण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मासे खाऊ नये.”

WhatsApp Image 2020-04-17 at 5.15.21 PM.jpeg

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडियोतील की-फ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडियो 2014 साली लिबियामध्ये घडलेल्या घटनेचा आहे.

युरोपातील वृत्तस्थळ युरोन्यूज वेबसाईटने युट्यूबवर हा व्हिडियो 25 ऑगस्ट 2014 साली अपलोड केला होता. त्यासोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो लिबियातील समुद्र किनाऱ्यावरील आहे. पलायन करून अवैधरीत्या युरोपात जाणाऱ्या स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडाली होती. त्यात मृत पावलेल्या स्थलांतरितांचे मृतदेह वाहून लिबियातील किनाऱ्यावर आले होते.

युरोन्यूजने याविषयी बातमीदेखील दिली होती. अवैधरीत्या प्रवास करणाऱ्या 100 पेक्षा जास्त स्थलांतरितांचे मृतदेह स्थानिक प्रशासनाने गोळा केले. पुढील काही दिवसदेखील अशा प्रकारे मृतदेह किनाऱ्यावर वाहत आले होते. मृतांपाशी कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे त्यांची नावे आणि ते कोणत्या देशाचे होते याची माहिती मिळाली नाही. 

Euronews-1.png

मूळ बातमी येथे वाचा – युरोन्यूजअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, समुद्रकिनारी वाहून आलेल्या मृतदेहांचा हा व्हिडियो कोरोना रुग्णांचा नाही. 2014 साली बोट बुडाल्यामुळे मृत पावलेल्या स्थलांतरितांचा हा व्हिडियो आहे. लिबियाच्या किनारी तो चित्रित करण्यात आला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना समुद्रात फेकून देत असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

Avatar

Title:कोरोना रुग्णांचे मृतदेह समुद्रात फेकण्यात येत नाहीत. तो व्हिडियो लिबियातील स्थलांतरितांचा आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False