छपाक चित्रपटात अ‍ॅसिड फेकणाऱ्याचे नाव राजेश नाही. त्याचे नाव बशीर आहे. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दीपिका पादुकोनने जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठात भेट दिल्यामुळे तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’ न पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  सोबत असाही दावा केला जात आहे की, छपाक चित्रपटात अ‍ॅसिड फेकणाऱ्याचे मुस्लिम नाव बदलून राजेश ठेवण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

अ‍ॅसिड हल्ल्याची पीडिता लक्ष्मी अगरवालच्या जीवनसंघर्षावर ‘छपाक’ चित्रपट आधारित आहे. तिच्या वर नईम खान (गुड्डू) नामक तरुणाने 2005 साली अ‍ॅसिड हल्ला केला होता. त्यावेळी लक्ष्मीचे वय केवळ 16 वर्षे होते. या चित्रपटात दीपिका पादुकोन लक्ष्मीची भूमिका ‘मालती’ या नावाने साकारत आहे.

मग चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या तरुणाच्या भूमिकेचे नाव काय?

बॉलिवूड हंगामा या चित्रपटांसंबंधित वेबसाईटवर या ‘छपाक’मधील कलाकार व ते साकारत असलेली भूमिका याची सविस्तर यादी दिलेली आहे. यामध्ये विशाल दहिया नामक अभिनेता बशीर (बब्बू) नावाची भूमिका करीत असल्याचे दिले आहे.

याविषयी अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, ‘छपाक’ चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्याचे नाव बशीर ठेवण्यात आले आहे. विशाल दहिया हा अभिनेता ही नकारात्मक भूमिका साकारत आहे.

मूळ बातमी येथे वाचा – बॉलिवूड हंगामा

चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्याचे नाव जर बशीर आहे तर, मग राजेश नावाची भूमिका कोणाची आहे?

वरील रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसते की, मालतीच्या (दीपिका पादुकोन) प्रियकराचे नाव राजेश ठेवण्यात आले आहे. मालतीवर अ‍ॅसिड हल्ला होण्यापूर्वी तिचा जो कुमारवयीन प्रियकार होता त्याची ही भूमिका आहे. अंकित बिश्त नावाच्या अभिनेत्याने ती वठवली आहे.

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीतही सांगितले की, ‘छपाक’ चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्याचे नाव राजेश ठेवण्यात आलेले नाही. या भूमिकेचे नाव बशीर (बब्बू) आहे. 

‘छपाक’ चित्रपटाचा 8 जानेवारी रोजी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेले अनेक पत्रकार व समीक्षकांशी टाईम्स नाऊच्या रिपोर्टरने बातचीत करून चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्याचे नाव काय याविषयी जाणून घेतले. तेव्हा सगळ्यांनी सांगितले की, चित्रपटात राजेश नावाची भूमिका दीपिकाच्या बॉयफ्रेंडची असून, अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्याचे नाव बशीर (बब्बू) आहे.

स्वराज्य मॅगझीननेदेखील अ‍ॅसिड हल्ला करण्याचे मुस्लिम नाव बदलून हिंदू नाव ठेवण्यात आल्याचे आधी वृत्त दिले होते. त्यानंतर न्यूजलाँड्री न्यूज पोर्टलचे सहसंस्थापक व पत्रकार अभिनंदन सेक्री यांनी ट्विट करून हे वृत्त चूकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. अभिनंदन यांनी स्वतः हा चित्रपटा स्पेशल स्क्रीनिंगमध्ये पाहिला होता. त्यावरून त्यांनी ट्विट केले की, चित्रपटात हल्ला करणाऱ्याचा धर्म बदलण्यात आलेला नाही. यानंतर स्वराज्य मॅगझीनने त्यांचे ट्विट डिलिट केले.

विविध वेबसाईट्स, पत्रकार, आणि फॅक्ट चेकर्सने छपाक चित्रपटाविषयीच्या खोट्या दाव्याचे सत्य समोर आणल्यानंतर आता पुन्हा प्रचार केला जातोय की, चित्रपटकर्त्यांनी रातोरात नावात बदल करून बशीर खान केले. परंतु, हेदेखील चूक आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ‘छपाक’ चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला करण्याचे मुस्लिम नाव बदलून हिंदू नाव ठेवण्यात आलेले नाही. चित्रपटात हल्लेखोराचे नाव बशीर (बब्बू) असून, राजेश हे नाव मालतीच्या (दीपिका) प्रियकराचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर होत असलेला दावा खोटा आहे. तसेच लक्ष्मी अगरवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव नईम आहे, नदीम नाही.

Avatar

Title:छपाक चित्रपटात अ‍ॅसिड फेकणाऱ्याचे नाव राजेश नाही. त्याचे नाव बशीर आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •