कोरोना पसरविण्याच्या उद्देशाने रस्त्यावर या नोटा फेकलेल्या नाही. वाचा ‘त्या’ व्हायरल व्हिडियोमागील सत्य

Coronavirus False

कोरोना विषाणूची केवळ ऑफलाईन जगात नाही तर, ऑनलाईन विश्वातही प्रचंड दहशत आहे. म्हणून तर कोणत्याही व्हिडियोला कोरोनाशी जोडून षंडयंत्राची फोडणी दिली जाते. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटा  पोलिस दंडुक्याने गोळा करीत असल्याचे दिसते. मुद्दामहून कोरोना पसरविण्यासाठी या नोटा रस्त्यावर फेकल्या असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या व्हिडियोसोबत केला जाणारा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सदरील व्हिडियोमध्ये पोलिस कर्मचारी काठ्यांच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेल्या नोटा गोळा करीत आहेत. आजूबाजूला जमलेल्या गर्दीतील लोकांनी यावेळ व्हिडियो शुटिंग केली. पीसीबी टुडे नावाच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडियो शेयर करीत म्हटले की, “कोरोना पसरवण्यासाठी असा किळसवाणा प्रकार केला जात आहे.”

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

या व्हिडियोचे सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नेमका कुठला आहे, हे शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी व्हिडियोतील की-फ्रेम निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा व्हिडियो मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील असल्याचे कळाले.

एनटीडीव्हीच्या बातमीनुसार, 16 एप्रिल रोजी इंदूरमधील एका रस्त्यावर स्थानिकांना 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटा पडलेल्या दिसल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, इंदूरच्या खातीपूरा भागात ही घटना घडली होती. तेथील पोलीस उपमहानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले की, नोटा गोळा करण्यात आल्या असून आसपासच्या दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. घटनास्थळाहून 6 हजार 480 रुपये जप्त करण्यात आल्या. सदरील घटनेचा तपास हिरा नगर पोलिस ठाण्याअंतर्गत करण्यात येत आहे.

Toi-11.png

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट हिरा नगर पोलिसा ठाण्याशी संपर्क साधला. तेथील प्रभारी राजीव भदोरिया यांनी माहिती दिली की, एका गॅस कंपनीच्या डिलीव्हरी बॉयच्या खिशातून खातीपूरा भागात रस्त्यावर या नोटा पडल्या होत्या. राम नरेंद्र यादव असे या डिलीव्हरी बॉयचे नाव असून, 16 एप्रिल रोजी दुपारी सायकलवरून जाताना त्याच्या खिशातून हे पैसे पडले होते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे याची खात्री करण्यात आली. चौकशी आणि तपासाअंती हे पैसे परत करण्यात आले.

मग या कोरोनाचा या घटनेशी काही संबंध आहे का याविषयी श्री. भदोरिया म्हणाले की, सदरील व्हिडियोला धार्मिक रंग देऊन फिरवण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. परंतु, कोणत्याही विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने कोरोना पसरविण्याच्या उद्देशाने या नोटा मुद्दामहून रस्त्यावर फेकल्या नव्हत्या. असा दावा करणे चूक आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रस्त्यावर पडलेल्या नोटा काठ्यांनी उचलण्याचा हा व्हिडियो इंदूर येथील असून, गॅस डिलिव्हरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या खिशातून या नोटा खाली पडल्या होत्या. कोरोना पसरविण्यासाठी कोणी त्या मुद्दामहून फेकल्या नव्हत्या, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:कोरोना पसरविण्याच्या उद्देशाने रस्त्यावर या नोटा फेकलेल्या नाही. वाचा ‘त्या’ व्हायरल व्हिडियोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False