युद्ध झाल्यास फ्रान्स देणार तीन तासांत राफेल विमाने? काय आहे यामागे सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे की, पाकिस्तानसोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास फ्रान्स केवळ तीन तासांमध्ये भारताला राफेल लढाऊ विमाने उपलब्ध करून देणार आहे. 26 जानेवारी रोजी भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर ही पोस्ट फिरत आहे. या दाव्याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

महाराष्ट्र देशा नामक फेसबुक पेजवरून 28 फेब्रुवारी रोजी खालील पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नावे लिहिले आहे की, “जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर 3 तासांच्या आत राफेल विमान भारताच्या हवाली करू.”

मूळ पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा – महाराष्ट्र देशअर्काइव्ह

पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 225 पेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आली. दर्जेदार या फेसबुकवरून 27 फेब्रुवारी रोजी ही पोस्ट करण्यत आला होता. परंतु, त्या पेजवरून हा फोटोनंतर डिलीट करण्यात आला.

सत्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारचे काही वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेतला. त्यासाठी गुगलवर “Emmanuel Macron On India Pakistan” असे सर्च केले. तेव्हा खालील बातम्या समोर आल्या.

फ्रान्सच्या युरोपीय आणि परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या पत्राचा दाखला देत इंडिया टुडेने 26 फेब्रुवारीला वृत्त दिले की, सीमापार दहशतवादापासून संरक्षण करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे मान्य करीत फ्रान्सने सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. मूळ बातमी तुम्ही येथे वाचू शकता – इंडिया टुडेअर्काइव्ह

नंतर मग आम्ही फ्रान्सच्या युरोपीय आणि परराष्ट्र खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर हे मूळ पत्र शोधले. त्याचा मराठीतून स्वैरानुवाद खालील प्रमाणे –

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा फ्रान्स तीव्र शब्दांत निषेध करतो. भारताला सीमापार दहशतवादापासून स्वरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असून, पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटनांचा बिमोड करावा. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत फ्रान्स भारताच्या पाठीशी असून, पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा करून त्यांची आर्थिक रसद बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही प्रयत्न करू. भारत आणि पाकिस्तानला आम्ही विनंती करतो की, सैन्य कारवाईचा पर्याय अवलंबून शांतता भंग करण्यापासून स्वतःला रोखावे. शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अत्यंत आवश्यक आहे.

फ्रान्सच्या युरोपीय आणि परराष्ट्र खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅँडरवरूनदेखील हे पत्र ट्विट करण्यात आले होते. ते मूळ इंग्रजी तुम्ही खाली वाचू शकता.

ट्विटर-अर्काइव्ह

यामध्ये कुठेही भारताला युद्धजन्य परिस्थितीत राफेल विमान देण्याचा उल्लेख नाही.

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने मग भारताला राफेल विमाने कधीपर्यंत मिळणार याचा शोध घेतला असता, पुढील बातम्या आढळून आल्या.

द इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत सांगितले की, सप्टेंबर 2019 मध्ये पहिले राफेल विमान मिळणार. मूळ बातमी येथे वाचा – द इकॉनॉमिक टाईम्स

एनडीटीव्हीने 4 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या बातमीतही वरीलप्रमाणे माहिती देण्यात आली आहे. मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेडोने मग निर्मला सीतारमन यांनी 4 जानेवारी रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडियो यूट्यूबवर शोधला. तेव्हा खालील व्हिडियो समोर आला.

हा व्हिडियो दुरदर्शनने (डीडी न्यूज) 4 जानेवारी 2019 रोजी अपलोड केला होता. यामध्ये 13.45 मिनिटापासून निर्मला सीतारमन राफेल विमाने सप्टेंबर 2019 पासून मिळण्यास सुरवात होणार असल्याचे संसदेला सांगतात. “2016 साली करार केल्यानंतर तीन वर्षांनी पहिले विमान दिले जाईल, असे राफेल डिलमध्ये नमूद होते. त्यानुसार सप्टेंबर 2019 मध्ये पहिले विमान मिळेल. त्यानंतर 2022 पर्यंत डीलनुसार संपूर्ण 36 विमाने भारताला प्राप्त होतील,” असे त्यांनी सांगितले.

निष्कर्ष

फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीतून हे सिद्ध होते की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताला 3 तासांमध्ये राफेल विमान उपलब्ध करून देण्याचे वक्तव्य केले नाही. फ्रान्सच्या युरोपीय आणि परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या पत्रामध्ये कुठेही विमान देण्याचा उल्लेख नाही. तसेच राफेल विमाने सप्टेंबर 2019 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहेत. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:युद्ध झाल्यास फ्रान्स देणार तीन तासांत राफेल विमाने? काय आहे यामागे सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False