तिबेटमध्ये ढग जमिनीवर उतरले नव्हते. तो वाळूच्या वादळाचा व्हिडियो आहे. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

निसर्ग अचाट आणि आचंबित करणाऱ्या गोष्टींना भरलेला आहे. निसर्गाचा करिष्मा कधी कसा पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. परंतु, आता मोबाईल फोन आल्यामुळे निसर्गाचे हे चमत्कार कॅमरेऱ्यात कैद करून जगभर पसरू लागले आहेत. असेच एक अनोखे दृश्य तिबेटमध्ये पाहायला मिळाल्याचे म्हटले जात आहे. तिबेटमध्ये जमिनीवर ढग उतरल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काय आहे पोस्टमध्ये?

1 मिनिटे 43 सेकंदाच्या क्लिपमध्ये जमिनीवर ढग उतरल्याचे म्हटले आहे. हा व्हिडियो तिबेटमधील असल्याचे सांगितले जातेय. दुर्गम भागातील रस्त्यावर ट्रक थांबवून काही लोकांनी हा व्हिडियो तयार केला आहे. समोर रस्त्यावर “ढग थांबल्याचे” दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी तो 9049043487  या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवून त्याची सत्यता तपासण्याची विनंती केली.

मूळ व्हडियो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

तिबेटमध्ये असे काही घडले होते का याचा इंटरनेटवर शोध घेतला असता हा व्हिडियो गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध असल्याचे आढळले. काहींना याला तिबेटमधील म्हटले तर, काहींनी हा व्हिडियो चीनमधील विविध शहरांच्या नावाने शेयर केलेला आहे. युट्यूबवर एका यूजरने हा व्हिडियो हा तिबेटमध्ये आलेल्या सँडस्टॉर्मचा (वाळूचे वादळ) असल्याचे म्हटले आहे. हा धागा पकडून मग आणखी शोध घेतला.

चीनमधील शांघाय ऑब्जर्व्हर नावाच्या वेबसाईटने हा व्हिडियो वाळूचे वादळ असल्याचा गेल्या वर्षी खुलासा केला होता. हाच व्हिडियो चीनमध्येसुद्धा काही वर्षांपूर्वी जमिनीवर ढग थांबल्याचा म्हणून व्हायरल झाला होता. तेव्हा तज्ञांनी हा व्हिडियो वाळूच्या वादळाचा असल्याचा सांगितले होते. व्हिडियोमध्ये ढग नसून, धुळीचा लोट दिसत आहेत. चीनमध्ये असे वाळूचे वादळ येणे सामान्य बाब आहे. 

मूळ बातमी तुम्ही येथे वाचू शकता – शांघाय ऑब्जर्व्हरअर्काइव्ह

गेल्यावर्षी 25 जुलै 2018 रोजी चीनमधी गोल्मू शहरात आलेल्या वाळूच्या वादळाचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्येसुद्धा धुळीचे लोट ढगासारखेच वाटतात.

सँडस्टॉर्म किंवा डस्टस्टॉर्म म्हणजे काय?

मराठीमध्ये याला आपण वाळूचे किंवा धुळीचे वादळ म्हणू शकतो. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेनुसार, उत्तर आफ्रिका, पश्चिम व मध्य आशिया आणि चीनमध्ये असे वाळूचे वादळ येतात. जेव्हा पावसाचे ढग जमा होऊन वादळी वारे वाहू लागते तेव्हा सपाट व शुष्क जमिनीवरील धुळ आकाशात उडू लागते. त्यामुळे तापमान वाढून ढगातील पाणी खाली पडण्यापूर्वीच त्याचे पुन्हा बाष्प होते. त्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागापाशी उष्ण तर आकाशात शीत वातावरण तयार होते. त्यामुळे जोरादार वारे वाहू लागतात व जमिनीवरील धुळीचे लोट उठतात. वाळूचे वादळ कसे तयार होते याचा व्हिडियो खाली पाहू शकता.

भारतामध्येसुद्धा गेल्यावर्षी उत्तर प्रदेश आणि राजस्थानात वाळूच्या वादळाने तडाखा बसला होता. यामध्ये जवळपास 109 जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी राजस्थानमधील चुरू शहरात आलेल्या वाळूच्या वादळाचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. संपूर्ण शहाराला या वादळाने व्यापून टाकले होते. ढगासारखे जे दिसते तो धुळीचा पडदा असतो.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलला व्हिडियो जमिनीवर ढग थांबल्याचा नाही. तो वाळूच्या वादळाचा (सँडस्टॉर्म) आहे. गेल्या काही वर्षांपासून तो इंटरनेवर उपलब्ध आहे. तुमच्याकडेसुद्धा असे काही व्हिडियो किंवा फोटो असतील ज्यांची सत्यता तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ते 9049043487 या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पाठवा.

Avatar

Title:तिबेटमध्ये ढग जमिनीवर उतरले नव्हते. तो वाळूच्या वादळाचा व्हिडियो आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False