बराक ओबामा यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा व्हिडिओ संपादित केलेला; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

अमेरिकेत सुरू असणाऱ्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचे जगभर पडसाद उमटत आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली भेटवस्तू ओबामा यांनी ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी वर्तनाचा निषेध म्हणून फेकून दिली असा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. ओबामा यांच्या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा हा व्हिडिओ खरा आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नीट पाहिल्यावर सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीचा लोगो या व्हिडिओत दिसून आला. त्यानंतर वेगवेगळे शब्दप्रयोग करत या व्हिडिओचा शोध घेतला. त्यावेळी 20 जानेवारी 2017 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ नीट पाहिला असता लक्षात येते की, मिलेनिया ट्रम्प या भेटवस्तूचा निळा बॉक्स मिशेल ओबामा यांना देतात. हा भेटवस्तूचा बॉक्स नंतर बराक ओबामा घेतात आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला देतात. या संपूर्ण व्हिडिओत भेटवस्तू फेकून दिल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असलेले बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांचे स्वागत करतानाचा हा व्हिडिओ असल्याचे व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीतून दिसून येते.

फेसबुक पोस्ट

तुम्ही याबाबत सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने दिलेला संपूर्ण वृत्तांतही खाली पाहू शकता. व्हायरल झालेला भाग आपल्याला 25 व्या सेकंदाला दिसून येईल.

रशियाच्या  Ruptly या वृत्तसंस्थेने या घटनेचे 20 जानेवारी 2017 रोजी थेट प्रक्षेपण केले होते. यासोबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत करताना ओबामा. अधिक स्पष्ट असलेल्या या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की 7 मिनिटे 12 व्या सेकंदाला बराक ओबामा हे भेटवस्तूसह आत जातात आणि ती कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करतात. 

यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ तांत्रिकद्ष्ट्या संपादित करुन बराक ओबामा यांनी ही भेटवस्तू फेकून दिल्याचे दर्शविण्यात आले आहे. हा व्हिडिओ जुना असून त्याचा सध्याच्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाशी कोणताही संबंध नाही.

निष्कर्ष 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वर्णद्वेषविरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली भेटवस्तू फेकून दिल्याचा दावा असत्य आहे. 

Avatar

Title:बराक ओबामा यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा व्हिडिओ संपादित केलेला; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False