देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलेले नाही. वाचा सत्य

False राजकीय

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला असताना सगळ्या पक्षांचे दिग्गज नेते राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. अशाच एका सभेत राहुल गांधी यांनी देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे म्हटले, असे दाखवणारी व्हिडियो क्लिप सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियो क्लिपची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

17 सेकंदाच्या या क्लिपमध्ये राहुल गांधी म्हणतात की, कुछ नहीं होने वाला. मैं तो लंदन चला जाऊंगा, मेरे बच्चे तो अमेरिका में जा कर पढेंगे. मेरा हिंदुस्तान से कुछ लेना-देना नहीं है. मेरे पास तो हजारों करोड़ रुपय हैं. मैं तो कभी भी चला जाऊंगा. (काही फरक नाही पडणार. मी तर लंडनला निघून जाईल. माझी मुले अमेरिकेत शिक्षण घेतील. भारताशी मला काही देणेघेणे नाही. माझ्याकडे तर हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे. मी तर कधी पण निघून जाऊ शकतो.)

व्हिडियोवर लिहिले की, शेवटी याने कबुल केलंच. हा बायका पोरांना घेऊन देशातून पळून जाणार.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांनी खरंच देश सोडून जाण्याचे विधान केले का याचा गुगलवर शोध घेतला. तेव्हा असे काहीच आढळून आले नाही. व्हायरल क्लिपमध्ये राहुल गांधी प्रचारसभेत बोलताना दिसत आहेत. त्यानुसार, त्या सभेतील भाषणाच्या व्हिडियोचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, 13 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांनी लातूर येथे सभा घेतली होती. यावेळी केलेल्या भाषणातील ही क्लिप आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणाचा 19 मिनिटांचा व्हडियो अपलोड केलेला आहे. तो पाहिला असता कळते की, राहुल गांधी यांचे विधान एडिट करून पसरविले जात आहे. या व्हिडियोच्या 15.12 मिनिटांपासून राहुल गांधी म्हणतात की:


“नीरव मोदी, मेहुल चोकसी अच्छी नींद लेते हैं, बिना कोई डर के. कुछ नहीं होने वाला. मैं तो लंदन चला जाऊंगा, मेरे बच्चे तो अमेरिका में जा कर पढेंगे. मेरा हिंदुस्तान से कुछ लेना-देना नहीं है. मेरे पास तो हजारों करोड़ रुपय हैं. मैं तो कभी भी चला जाऊंगा. नरेंद्र मोदीजी का तो मित्र हूं, मेरे पास तो हजारों करोड़ रुपय हैं. मैं तो कभी भी चला जाऊंगा. यह हिंदुस्तान की सच्चाई है.”


याचा अर्थ की, राहुल गांधी स्वतः लंडनला जाण्याविषयी बोलत नव्हते. बँकांचे पैसे बुडवून पळून जाणाऱ्या उद्योगपतींबद्दल ते बोलत होते. घोटाळे करून पलायन करणारे नीरव मोदी व मेहूल चोकसीसारखे उद्योगपती कसा विचार करतात याविषयी ते सांगत होते. व्हायरल क्लिपमध्ये मात्र नीरव मोदी व मेहूल चोकसी यांचे नाव डिलीट करून राहुल गांधींचे केवळ “मैं तो लंदन चला जाऊंगा, मेरे बच्चे तो अमेरिका में जा कर पढेंगे” एवढे वाक्य दाखवले जाते. यावरून वाटते की, राहुल गांधीच देशातून पळून जाण्याचे बोलत आहेत. पण ते खोटं आहे.

खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये तुम्ही एडिट केलेली क्लिप आणि ओरिजिनल व्हिडियो यांची तुलना पाहू शकता. यावरून स्पष्ट होते की, राहुल गांधींच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.

निष्कर्ष

राहुल गांधी यांनी देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचे विधान केलेले नाही. लातूर येथील भाषणात त्यांनी नीरव मोदी व मेहूल चोकसीसारखे उद्योगपती पैसे बुडवून कसे विदेशात जातात याबद्दल ते बोलत होते. मूळ व्हिडियो एडिट करून त्यांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. त्यामुळे ही क्लिप आणि पोस्ट चुकीची आहे.

Avatar

Title:देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलेले नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False