Fact Check : राज ठाकरे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणूक न होऊ देण्याची भूमिका घेतली आहे का?

False राजकीय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे म्हटल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ubaid vasiullah shaikh यांनीही अशीच पोस्ट केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’च्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली आहे. मतपत्रिका वापरा अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असे ते म्हणाले आहेत का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला. 

दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे यांनी देशातील ईव्हीएम प्रणालीला विरोध केला आहे. यासाठी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली आहे. लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर अढळ विश्वास असणे महत्वाचे असल्याचे मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सर्व घटकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्याने पुढील निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी राज ठाकरेंनी केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

दैनिक सकाळ / Archive

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळानेही राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांची दिल्लीत भेट घेतल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तात त्यांनी राज ठाकरेंनी मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी केल्याचे म्हटले आहे. 

जय महाराष्ट्र / Archive

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ईव्हीएममुळे 370 लोकसभा मतदारसंघात घोळ झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर उपस्थित केल्याचे वृत्त बीबीसी मराठीने दिले आहे. राज ठाकरे हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर नेमके काय म्हणाले, हे बीबीसीच्या या व्हिडिओत आपण पाहू शकता. 

राज ठाकरे यांच्या ट्विटर अकाऊंटवर आम्ही महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे म्हणालेत का हे शोधले मात्र त्यांनी असे कोणतेही ट्विट त्यांनी केल्याचे दिसून आले नाही. राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावरही अशी कोणतीही माहिती आम्हाला दिसून आली नाही. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही निवडणुका मतपत्रिकांवर व्हाव्यात अशी मागणी करत गायब मतदान यंत्रांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे मात्र राज ठाकरे म्हणाल्याचे या संपूर्ण पडताळणीत कुठेही दिसून आले नाही. 

निष्कर्ष

राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’ला विरोध केल्याचे दिसून येत आहे. ‘ईव्हीएम’ऐवजी कागदी मतपत्रिकांवर मतदान घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी मांडली आहे. याबाबत त्यांनी कोणतीही नवी भूमिका 11 जुलै 2019 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत मांडलेली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : राज ठाकरे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणूक न होऊ देण्याची भूमिका घेतली आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False