
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला सत्ता कायम राखण्यात यश आले. भाजप आणि शिवसेना राज्यात अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमाकांचे पक्ष ठरले. त्यामुळे शिवसेनेकडून यंदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला जाऊ लागला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचे अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट दिल्याचे फोटो आणि व्हिडियो पसरवून दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री होण्याची प्रार्थना करण्यासाठी ते अजमेरला गेले होते. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
अनेक युजर्सनी आदित्य ठाकरे यांच्या अजमेर दर्गा भेटीचे न्यूज व्हिडियो शेयर केले आहेत. तसेच काहींनी या भेटी दरम्यानचे फोटो अपलोड केले आहेत. या भेटीवरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली की, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सिद्धीविनायक गणपती मंदिर सोडून अजमेरला का प्रार्थना केली?
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला कधी भेट दिली होती हे सर्वप्रथम तपासले. सदरील पोस्टमधील व्हिडियो न्यूज-18 इंडिया चॅनेलवरील आहे. चॅनेलच्या युट्युब अकाउंटवर त्याचा शोध घेतला असता कळाले की, हा व्हिडियो 8 जून 2019 रोजीचा आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल तर 24 ऑक्टोबरला जाहीर झाले होते. याचाच अर्थ की, आदित्य ठाकरे यांच्या 5 महिन्यांपूर्वीच्या भेटीचा हा व्हिडियो आहे.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आदित्य ठाकरे यांनी विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी ठाकरे कुटुंबाची कुलदेवी एकविरा देवी आणि अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्यावर चादर चढविली. इंडिया टीव्ही चॅनेलनेदेखील ही बातमी प्रसारित केली होती.
लोकसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्गा येथे चादर चढवून मन्नत मागितली होती. ती पूर्ण झाल्यावर त्यांनी 8 जून रोजी शिवसेनेच्या विविध नेत्यांसह अजमेरला भेट देऊन चादर चढविली होती. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवासेना पदाधिकारी राहुल कनाल होते.

मूळ बातमी येथे वाचा – झी न्यूज । अर्काइव्ह
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर 8 जून रोजी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री होण्याची प्रार्थना करण्यासाठी आदित्य ठाकरे अजमेर दर्ग्याला गेले असे म्हणने चूक आहे. पाच महिन्यांपूर्वीचा हा व्हिडियो/फोटो चुकीच्या दाव्यासह पसरविले जात आहेत.

Title:विधानसभेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
