राहुल गांधी केक कापत असलेला व्हिडियो मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नाही. वाचा सत्य

False

भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्त राहुल गांधी यांनी केक कापून डॉ. मनमोहन सिंग यांचा वाढदिवस साजरा केल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियो क्लिपमध्ये राहुल गांधी आणि डॉ. सिंग केक कापताना दिसतात. या व्हिडियोवरून काही लोक गांधी यांची प्रशंसा करत आहेत तर, काही त्यांची खिल्ली उडवत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियो पडताळणी केली.

मूळ व्हिडियो आणि पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर 20 सेंकदाची एक व्हिडियो क्लिप शेयर करण्यात येत आहे. यामध्ये राहुल गांधी आधी डॉ. सिंग यांचा हात धरून केक कापतात आणि तर ते स्वतः केक कापतात. या व्हिडियोसोबत एकाने लिहिले की, वाढदिवस कुणाचा आहे? केक कोण कापत आहे केक ज्याचा वाढदिवस आहे त्याला अशा प्रकारे द्यायची पद्धत फक्त गुलाम पक्षात असू शकते. 

दुसऱ्याने पोस्ट केले की, हा भारताचा पंतप्रधान बनणार म्हणतोय, अरे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचा वाढदिवस आज, कमीत कमीत केक तर कापू दे त्यांना. आणि मागून आवाज येतो की हे मीडिया मध्ये जायला पाहिजे. अरे 87 वर्षाचे झालेत ते आणि तुम्ही हे काय करताय त्यांच्यासोबत.

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांनी खरंच केक कापून डॉ. मनमोहन सिंग यांचा वाढदिवस साजरा केला का याचा शोध घेतला. गुगलवर याचा शोध घेतल्यावर कळाले की, हा व्हिडियो जुना असून, मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नाही. ‘आज तक’ वाहिनीच्या 28 डिसेंबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केक कापून काँग्रेस पक्षाचा 134 वा वर्धापनदिन साजरा केला होता. हा व्हिडियो या कार्यक्रमातील आहे.

मूळ बातमी येथे वाचा- आजतक 

ANI वृत्तसंस्थेनेसुद्धा या कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. गेल्या डिसेंबर महिन्यात विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार निवडूण आले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.

अर्काइव्ह

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीसुद्धा केक कापतानाचे फोटो शेयर केले होते. त्यांनी लिहिले होते की, काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या दिवशी झेंडा फडकाविल्यानंतर राहुल गांधी आणि डॉ. सिंग यांनी केक कापला. या आनंदमय क्षणाचे ही छायाचित्रे आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी ए. के. अँटोनी यांचासुद्धा वाढदिवस असल्यामुळे दुसरा केकसुद्धा कापण्यात आला.

अर्काइव्ह

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्युब अकाउंटद्वारे 27 डिसेंबर 2018 रोजी काँग्रेस स्थापना दिनी केक कापतानाचा हा मूळ व्हिडियो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

राहुल गांधी आणि मनमोहन सिंग केक कापत असलेला व्हिडियो गेल्यावर्षी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचा आहे. काँग्रेसच्या 134 व्या वर्धापनदिनानिमित्त हा केक कापण्यात आला होता. त्यामुळे हा व्हिडियो डॉ. सिंग यांच्या वाढदिवसाचा आहे, असा दावा करणे असत्य ठरते.

Avatar

Title:राहुल गांधी केक कापत असलेला व्हिडियो मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False