लंडनमधील बसचा फोटो मुंबईची नवी डबल डेकर बस म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

मुंबईच्या खास ओळख असलेल्या डबल डेकर बसचा नवा लूक म्हणून एका अत्याधुनिक बसचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही नवीकोरी बस मुंबईतील कुलाबा आगारामध्ये दाखल झाली आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेल्या बसचा फोटो लंडनमधील आहे.

काय आहे दावा?

एका ब्रँड न्यू लाल रंगाच्या बसचा फोटो व्हायरल होत आहे. बसवर ‘बेस्ट’चा लोगो असून कुलाबा डेपो असेदेखील लिहिलेली आहे. सोबत कॅप्शन दिले की, “एक नवा लूक बेस्ट इलेक्ट्रिक डबल डेकर बेस्टच्या कुलाबा आगारांमध्ये दाखल”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेला हा फोटो खरंच बेस्टच्या नव्या डबल डेकर बसचा आहे का, हे तपासण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की ही बस भारतातील नाही. 

विकिपीडिया वेबसाईटवर या बसचा मूळ फोटो उपलब्ध आहे. त्यानुसार, ही बस लंडनमधील आहे. ‘अराईव्ह लंडन न्यू रूटमास्टर’ असे या बसचे नाव आहे. 

मार्टिन नामक व्यक्तीने 25 जून 2015 रोजी हा फोटो काढला होता. या मूळ फोटोला एडिट करून त्यावर ‘बेस्ट’ आणि ‘कुलाबा डेपो’ लिहिले गेले.

मूळ फोटो – विकिपीडिया

लोकल रेल्वेनंतर मुंबईकरांची जवळची मानली डबल डेकर बस या शहराची एक खास ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या बसगाड्या सेवेत आहेत. गेल्या वर्षी जुन्या पद्धतीच्या डबल डेकर बसेस बीएस-6 उत्सर्जन मापदंड पूर्ण करत नसल्यामुळे बंद करण्यात आल्या होत्या. 

एबीपी माझाच्या बातमीनुसार, देखभाल करण्याचा खर्च परवडत नसल्याने तसेच  नवीन मेट्रो मार्ग, उड्डाण पुलामुळे आता या डबल डेकर बस बेस्टमार्फत हळूहळू कमी केल्या जात आहेत.


हेसुद्धा वाचाः ‘बेस्ट’ने मुंबईत ईलेक्ट्रिक टॅक्सी सुरू केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य


परंतु, बेस्ट प्रशासनाने आधुनिक सेवायुक्त नवीन डबल डेकर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 100 गाड्यांसाठी निविदादेखील काढण्यात आली होती. 2021 मध्ये या नव्या बसेस सेवेत दाखल होतील असे सांगण्यात आले होते. परंतु, व्हायरल फोटोतील बस शहरात दाखल झाल्याची अद्याप अधिकृत बातमी आलेली नाही.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, लंडनमधील बसचा फोटो मुंबईची नवी ईलेक्ट्रिक डबल डेकर बस म्हणून व्हायरल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने बेस्ट प्रशासनाकडे याविषयी माहिती मागितली असून, ती मिळताच येथे अपडेट करण्यात येईल.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लंडनमधील बसचा फोटो मुंबईची नवी डबल डेकर बस म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False