खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे असे म्हटले का? वाचा सत्य

False राजकीय

विरोधी पक्षांनी ईव्हीएमला विरोध करीत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. नुकतेच विविध पक्षांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत या मागणीला जोर दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होत असल्याचे वक्तव्य केले आहे. या व्हिडियोच्या आधारे दावा केला जात आहे की, आता नरेंद्र मोदी यांनीसुद्धा बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे असे मान्य केले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमध्ये 21 सेंकदाची एक व्हिडियो क्लिप शेयर केलेली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, भाईयो और बहनों, अरे दुनिया के पढे लिखे देश भी, जब चुनाव होता है ना, तो बैलेट पेपर पर नाम पढ कर के फिर थप्पा मारतें है आज भी. अमेरिका में भी.

फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप शेयर केली जात आहे.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियो क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी त्यातील की-फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून मूळ व्हिडियोची लिंक मिळाली. नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून या मोदींच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडियो शेयर करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांनी 3 डिसेंबर 2016 रोजी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे ही सभा घेतली होती. सुमारे एक तासाच्या या व्हिडियोतून सदरील 21 सेंकदाची क्लिप एडिट केलेली आहे. या व्हिडियोच्या 55.07 व्या मिनिटांपासून सदरील व्हायरल क्लिप तुम्ही पाहू शकता.

परिवर्तन रॅली दरम्यान मुरादाबाद येथे घेण्यात आलेल्या सभेत मोदींनी विविध योजना आणि त्यामुळे झालेला लाभ याची माहिती दिली. विशेष करून तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे बँकिंग क्षेत्रात आलेला अमुलाग्र बदल, डिजिटल पेमेंट, रोकडरहित व्यवहार, जनधन योजना याबद्दल त्यांनी विचार मांडले. भारतात लोकांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून विकासाकडे वाटचाल केल्याचे त्यांनी म्हटले. 

हाच मुद्धा अधोरेखीत करताना ते 55.07 मिनिटापासून म्हणातात की, कुछ लोग कहते है हमारा देश गरीब है, लोग अनपढ है, लोगों को कुछ आता नही है. भाईयो और बहनों, अरे दुनिया के पढे लिखे देश भी, जब चुनाव होता है ना, तो बैलेट पेपर पर नाम पढ कर के फिर थप्पा मारतें है आज भी. अमेरिका में भी. ये हिंदुस्थान है, जिसको आप अनपढ कहते हो, गरीब कहते हो, वो बटन दबा कर वोट देना जानता है. भारत के लोगों की ताकत को कम मत आकीए. एक बार उसे पता चले की, इमानदारी का रास्ता ये है, तो मेर देश का गरीब से गरीब भी चल पडता है.

खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये व्हायरल क्लिप आणि मूळ क्लिप यांची तुलना केली आहे. ती ऐकल्यावर लक्षात येईल की, इतर देशांत जरी बॅलेट पेपरने मतदान होत असले तरी, भारतातील लोक इतके हुशार आहेत की, ते ईव्हीएमचा वापर करतात, असे मोदी सांगत आहेत. ते ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपर चांगले किंवा मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करावा, असे म्हणत नाही.

एनडीटीव्हीने या सभेच्या बातमीमध्येसुद्धा मोदींनी बॅलेट पेपरवर मतदान घ्या असे म्हटल्याचे वृत्त नाही. भारतीय जनतेला असुशिक्षित म्हणणाऱ्या विरोधकांवर टीका करताना त्यांनी वक्तव्य केले की, अधिक साक्षर देशात अजूनही बॅलेट पेपरच वापरतात. परंतु, भारतीय त्यांच्या पुढे असून ईव्हीएमद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात. या देशातील लोक बदल लवकर स्वीकरतात आणि तंत्रस्नेही आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

निष्कर्ष

मोदींच्या भाषणातील एक क्लिप एडिट करून ते बॅलेट पेपरने मतदान घेण्याचे मान्य करत असल्याचा असत्य दावा केला जात आहे. संपूर्ण भाषण ऐकल्यावर लक्षात येते की, ईव्हीएमला मोठ्या प्रमाणात भारतीयांनी स्वीकारल्यामुळे मोदी कौतुक करीत आहेत. इतर अधिक सुशिक्षित देशांमध्ये बॅलेट पेपर आहे. परंतु, भारतीयांनी ती पद्धत कधीची सोडल्याची मोदी यांनी तुलना केली होती. त्यांनी बॅलेट पेपरचे समर्थन केले नाही.

Avatar

Title:खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे असे म्हटले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False