पाकिस्तानमध्ये पुलावर घसरून पडणाऱ्या गाड्यांचा व्हिडिओ पुण्यातील अपघात म्हणून व्हायरल

False राष्ट्रीय

पुलावर एका मागून एक दुचाकी घसरून पडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जण हा व्हिडिओ पुण्यातील सांगत आहेत, तर काहींनी तो मुंबईचा म्हटलेला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ना पुण्याचा आहे, ना मुंबईचा. तो तर पाकिस्तानातील असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडिओमध्ये?

तीस सेकंदाच्या व्हिडिओत सायंकाळच्या वेळी एका पुलावर अनेक बाईक्स घसरून पडत आहेत. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “पुणे हडपसर ब्रिजवर ऑइल सांडले होते. पण पावसामुळे कोणाला दिसले नसल्याने कसे अपघात झाले बघा. त्यामुळे पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा.”

काही जणांनी मात्र हा व्हिडिओ मुंबईतील म्हटले आहे. नवी मुंबईच्या एका पुलावर टँकरगळती होऊन तेल सांडल्यामुळे असा अपघात झाला, असा दावा केला जात आहे.

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओतील कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ट्विटर आणि फेसबुकवर विविध युजर्सने हा व्हिडिओ पाकिस्तानातील कराची शहरातील असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानातील कंपनीच्या एका सीईओने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करून कराची शहरात पावसामुळे अपघात झाल्याची माहिती दिली होती.

व्हिडिओचे बारकाईने निरीक्षकेल्यावर पुढील तीन गोष्टी स्पष्टपण दिसतात. 

  1. Honda कंपनीचे शोरूम
  2. Vivo मोबाईलचे शोरुम
  3. Priceoye.pk वेबसाईटची जाहिरात

पैकी Price Oye ही पाकिस्तानातील ऑनलॉईन मोबाईल शॉपिंग वेबसाईट आहे. 

हा धागा पकडून शोध घेतल्यावर कळाले की, ही घटना पाकिस्तानातील कराची शहरातील आहे. रिपब्लिकन वेबसाईटच्या बातमीनुसार, कराचीतील मिलेनिया मॉलजवळील राशिद मिन्हास मार्गावरील पुलावर हा अपघात झाला होता.

कराची शहरात गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पुलावरील रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे गाड्या रस्त्यावर घसरून पडत होत्या. 

मूळ बातमी – रिपब्लिक

गुगल मॅपच्या मदतील शोध घेतला असता व्हायरल व्हिडिओतील फ्लायओव्हर मिळाला. खाली दिलेल्या मॅपमध्येतुम्ही स्पष्ट पाहू शकता की, हीरो कंपनी शोरुमच्या बाजूला व्हीवो मोबाईलचे शोरूम आहे. स्ट्रीट व्ह्युवमध्ये आपण संपूर्ण जागा पाहू शकता. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेल्या अपघाताचा व्हिडिओ पुणे किंवा मुंबईतील नाही. पाकिस्तानातील कराची शहरात हा अपघात झाला होता. रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे नाही, तर पावसाच्या पाण्यामुळे गाड्या घसरून पडल्या होत्या.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर पडताळणीसाठी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तानमध्ये पुलावर घसरून पडणाऱ्या गाड्यांचा व्हिडिओ पुण्यातील अपघात म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False