एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल; वाच सत्य

Missing Context राजकीय | Political

शिवसेनेतून बंड करून राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवास्थानी जाऊन भेट घेतली, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. सोबत पुरावा म्हणून शिंदे आणि पवार यांचा एकत्र फोटोदेखील शेअर केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो गेल्या वर्षीचा आहे. जुना फोटो चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे. 

काय आहे दावा?

एकनाथ शिंदे शरद पवारांना पुष्पगुच्छ देतानाचा फोटो शेअर करून म्हटले की, “महाराष्ट्रातील राजकीय वाटांना शेवटी इथं येऊनच थांबाव लागते.”

इतरांनी म्हटले की, “कितीही बंडखोरी केली तरी इथं डोकं टेकवायला यावच लागते.” 

विशेष म्हणजे मराठीतील प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी या फोटोवरून बातमी दिली होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची त्यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो गेल्या वर्षीचा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हाच फोटो 11 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर करण्यात आला होता. सोबत माहिती दिली होती की, “राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज आदरणीय खा. शरद पवार साहेबांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.”

याचाच अर्थ हा फोटो किमान आठ-नऊ महिन्यांपूर्वीचा आहे. त्यावेळीदेखील या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे शिंदेंकडे तात्पुरता मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवला जाणार, अशी चर्चा होती. परंतु, खुद्द शिंदे यांनीच या सर्व अफव असल्याचे सांगितले होते.


ALSO READ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला का?


विशेष म्हणजे 30 जून रोजी मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोविषयीसुद्धा खुलासा केला आहे.

त्यांनी 6 जुलै रोजी ट्विट करून म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या कथित भेटीचा व्हायरल फोटो जुना आहे. एकनाश शिंदे यांनीसुद्धा स्पष्ट केले की, त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अद्याप शरद पवारांची भेट घेतलेली नाही.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल; वाच सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Missing Context