गाड्यांवर स्लॅब कोसळल्याचा ‘तो’ व्हिडिओ मुंबईचा नसून, सौदीचा आहे; वाचा सत्य

False राजकीय

तौक्ते चक्रीवादळाचा पश्चिम किनारपट्टीवरील अनेक राज्यांना फटका बसला. महाराष्ट्रातही किनाऱ्यालगतच्या भागाचे जोरदार वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. मुंबईत तर अनेक वृक्ष उन्मळून पडली.

या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर स्लॅबचा मोठा भाग कोसळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलबाहेरील हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ मुंबईतीलदेखील नाही. 

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये उभ्या असलेल्या चार-पाच गाड्यांवर स्लॅब कोसळताना दिसते. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “ट्रायडेंट हॉटेलबाहेरील अत्यंत भयावह  व्हिडिओ”.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओचे बारकाईने लक्ष दिल्यावर सीसीटीव्ही फुटेजची तारीख दिसली. उजव्या कोपऱ्यात 30 जुलै 2007 अशी तारीख आहे.

म्हणजे हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. मग याबाबत अधिक शोध घेतला.

‘अल जझिरा’ (अरेबिक) वेबसाईटवरील 1 ऑगस्ट 2020 रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार हा व्हिडिओ सौदी अरेबियातील मदिना शहरातील आहे.  तेथे आलेल्या वादळामुळे एका इमारतीचा भाग कोसळून तो खाली उभ्या असलेल्या वाहनांवर पडला.

स्लॅब कोसळला तेव्हा एक व्यक्ती थोडक्यात बचावला. यामध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

या घटनेची बातमी रशियन टीव्ही- RT (अरेबिक), Al-Mursad, Anahar.com या वेबसाईटनेसुद्धा दिली होती.

मूळ बातमी – अल जझिराअर्काइव्ह

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आकाशवाणी मुंबईच्या ट्विटर खात्यावरून स्पष्ट करण्यात आले की, मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेल बाहेर स्लॅब कोसळल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. 

सोबत हॉटेलबाहेरील व्हिडिओसुद्धा ट्विट केलेला आहे. यात स्पष्ट दिसते की, हॉटेलचे वादळामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.

निष्कर्ष

गाड्यांवर स्लॅब कोसळतानाचा हा व्हिडिओ मुंबईतल ट्रायडेंट हॉटेल बाहेरचा नाही. हा व्हिडिओ सौदी अरेबियाच्या मदिना शहरातील आहे. 30 जुलै 2020 रोजी तेथी वादळामुळे इमारतीचा काही भाग कोसळून गाड्यांवर पडला होता. हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

Avatar

Title:गाड्यांवर स्लॅब कोसळल्याचा ‘तो’ व्हिडिओ मुंबईचा नसून, सौदीचा आहे; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False