
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सोशल मीडियावर असंबंधित आणि जुन्या व्हिडियोंचा पूरचा आला आहे. अधिकृत वृत्तवाहिन्यांनीसुद्धा पडताळणी न करताच जे येईल ते व्हिडिओ आणि फोटो रशिया-युक्रेन युद्धाचे सांगत पसरविण्यास सुरूवात केली.
न्यूज चॅनेल्सने आकाशात एका विशिष्ट रचनेत उडणाऱ्या विमानांचा व्हिडिओ शेअर करून म्हटले, की रशियाची लढाऊ विमाने युक्रेनच्या राजधानीत दाखल झाले.
फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची पडताळणी केल्यावर कळाले, की हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.
काय आहे व्हिडिओ?
झी-24 तास आणि सामनाने रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची बातमी देताना V-आकारात आकाशात उडणाऱ्या लढाऊ विमानांचा व्हिडिओ दाखवला.

मूळ पोस्ट – झी-24 तास (फेसबुक, युट्यूब)
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम तर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, गेल्या दोन वर्षांपासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. एका रशियन युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. सोबतच्या माहितीनुसार, 4 मे रोजी रशियातील टुशिनो शहरात हवाई दलाने वैमानिक कसरतीचा सराव केला होता. त्याचा हा व्हिडिओ आहे.
अधिक शोध घेतल्यावर मॉस्को टाईम्स वृत्तपत्रानेदेखील त्यांच्या युट्यूब चॅनेलवर या सरावाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत.
सोबत म्हटले, की रशियन हवाई दलातील 74 लढाऊ विमानांनी रशियाच्या विजय दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या कवायतीचा सराव केला. मूळ कार्यक्रम 9 मे रोजी होणार होता.
द्वितीय महायुद्धामध्ये रशियाने जर्मनीवर युद्ध मिळवला तो दिवस रशियामध्ये व्हिक्टरी डे (विजय दिवस) म्हणून दरवर्षी 9 मे रोजी साजरा केला जातो. सदरील व्हिडिओ 2020 मधील 75 व्या विजय दिनापूर्वीचा आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, दोन वर्षांपूर्वीच्या हवाई कवायतीचा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या नावे पसरत आहे. 4 मे 2020 रोजी विजय दिवासाच्या आधी रशियाच्या हवाई दलाने केलेल्या सरावाचा हा व्हिडिओ आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी 24 फेब्रुवारी युक्रेनवर सैन्य कारवाई करण्याची घोषणा केली. म्हणजेच हा व्हिडिओ त्याआधीचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हवाई कवायतीचा जुना व्हिडिओ युक्रेनमध्ये रशियाची लढाऊ विमाने दाखल झाले म्हणून व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
