रशियाचे सैनिक पॅराशूटद्वारे युक्रेनमध्ये उतरल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; मीडियाने दाखवले जुने व्हिडिओ

False आंतरराष्ट्रीय

रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्या देताना जुनेच व्हिडिओ दाखविण्याची वाहिन्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. झी-24 तास वाहिनीने रशियन सैनिक पॅराशूटच्या साहाय्याने युक्रेनमध्ये उतरल्याची बातमी देताना सैनिक पॅराशूटसह उतरत असल्याचा व्हिडिओ दाखवला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित नसल्याचे आढळले. 

काय आहे दावा?

झी-24 तास वाहिनीवर प्रसारित बातमीत सांगण्यात आले, की रशियाचे राष्ट्रपती व्लादमिर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश देताच रशियाचे सैन्य पॅरशूटद्वारे युक्रेनच्या खाराकीव्ह प्रांतामध्ये उतरले.

व्हिडिओ येथे पाहा – युट्यूब | फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ इंटरनेटवर गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. एका ट्विटर युजरने 2016 मध्ये हा व्हिडिओ अपलोड केला होता. रशियन भाषेतील ट्विटमध्ये Rostov (Ростов) आणि Airborne Troops (ВоздушноДесантныеВойска) चा उल्लेख आहे.

हा संदर्भ घेत अधिक शोध घेतला. फेसबुकवर मेड इन रशिया नावाच्या पेजने 18 सप्टेंबर 2016 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये म्हटले आहे की, Ilyushin Il-76 नावाच्या रशियन बनावटीच्या विमानातून सैन्याने 2014 साली पॅराशूटद्वारे शत्रूभूमीत उतरण्याचा सराव केला होता.

हा धागा पकडून अधिक सर्च केले असता एका युट्यूब चॅनेलवर 18 मार्च 2014 रोजी अपलोड करण्यात आलेल्या रशियन वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडिओ आढळला. 

मिलिटरी डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवरसुद्धा हाच व्हिडिओ 21 मार्च 2014 रोजी अपलोड करण्यात होता.

निष्कर्ष

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की पॅराशूटद्वारे उतरणाऱ्या सैनिकांचा हा व्हिडिओ किमान 2014 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाशी या व्हिडिओ काही संबंध नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रशियाचे सैनिक पॅराशूटद्वारे युक्रेनमध्ये उतरल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; मीडियाने दाखवले जुने व्हिडिओ

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False