भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य

False राजकीय

देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच लसीकरणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात की, भाजपचे सदस्य फोटो/व्हिडिओ काढण्यासाठी कोरोनाची लस टोचून घेण्याचे केवळ नाटक करीत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

काय आहे दावा?

43 सेकंदाच्या क्लिपमध्ये एक महिला आणि एक पुरुष लस घेत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते, नर्स त्यांना लस टोचत नाही. यावरून दावा केला आहे की, “नीट व्हिडीओ बघा..भाजपचे देशभक्त लोक लस घेण्याच कस नाटक करत आहेत..आता हे फोटो काढणार आणि त्याची जाहिरात करणार. खरोखर लस घ्यायला का घाबरत असतील हे लोक..जनतेला किती दिवस फसवत राहणार.”

तसेच काहींनी म्हटले की, वैज्ञानिकांवर यांना विश्वास नाही का?

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्हअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे तपासले. तेव्हा कळाले की, हा व्हिडिओ कर्नाटकमधील तुमकुर जिल्हातील आहे. ‘वर्धभारती’ नामक एका कानडी वेबसाईटवरील बातमीनुसार, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव डॉ. रजनी आहे तर, पुरुषाचे नाव डॉ. नागेंद्रप्पा असे आहे.

डॉ. नागेंद्रप्पा हे तुमकुरचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे फेटाळले.

“सोशल मीडियावरील दावा पूर्णतः खोटा आहे. तुमकुर जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी रोजी लसीकरणाला सुरुवाती झाली होती. त्या दिवशी मी स्वतः लस घेतली,” डॉ. नागेंद्रप्पा म्हणाले. “डॉ. रजनी माझ्या पहिले लस टोचून घेतली होती. परंतु, नंतर मीडिया प्रतिनिधी आले आणि त्यांनी आम्हाला बातमीसाठी फोटो/व्हिडिओ काढण्याची विनंती केली. त्यामुळे पत्रकारांच्या मागणीखातर आम्ही लस घेत असल्यासारखी पोज दिली. एक जिल्हा आरोग्य अधिकारी होण्याच्या नात्याने मी सर्वप्रथम लस घेऊन लोकांना आश्वस्त केले होते. परंतु, काही लोक या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढत आहेत.”

डॉ. रजनी तुमकुर नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या आहेत. आम्ही त्यांनासुद्धा संपर्क केला. त्या म्हणाल्या की, “आमच्या कॉलेजमध्ये लसीकरण केंद्र आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी 11.30 तो 12 वाजेदरम्यान मी लस घेतली. एवढेच नाही तर जिल्हातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा लस घेतली. आम्ही लस घेतल्यानंतर थोड्या वेळाने पत्रकार आले. बातमीसाठी फोटो द्या म्हणून त्यांनी आम्हाला लस टोचत असल्याचे फोटो सेशन करण्यास सांगितले. आम्ही आधीच लस घेतलेली असल्यामुळे या व्हिडिओत आम्हाला लस देताना दिसत नाही.”

या व्हिडिओबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण आपण खाली पाहू शकता.

“मी एक डॉक्टर असून माझ्याबाबत इंटरनेटवर असे चुकीचे दावे केले जात असल्यामुळे खूप त्रास होत आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून लोकांमध्ये लसीबद्दल चुकीचा संदेश जाईल, याची लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे,” असेही डॉ. रजनी म्हणाल्या.

फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याकडे लस घेतल्याचे पुरावे मागितल्यावर त्यांनी काही कागदपत्रे पाठवली. ज्यांना लस दिली जाते त्यांना को-विन अ‍ॅपद्वारे नोंदणी केली जाते. डॉ. रजनी यांचे को-विन नोंदणीचा स्क्रीनशॉट पाठवला.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, एक तर या व्हिडिओमधील हे दोघे भाजप कार्यकर्ते नाहीत. ते कर्नाटकच्या तुमकुर जिल्हातील प्रशासकीय डॉक्टर आहेत. तसेच दोघांनीसुद्धा लस घेतलेली आहे. मीडिया उशीरा आल्यामुळे बातमीसाठी फोटो देण्यासाठी त्यांनी पोज देतानाचा हा व्हिडिओ आहे. तो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

Avatar

Title:भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False