मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सोडून जाईल, असे शबाना आझमी किंवा शाहरुख म्हणालाच नव्हता

False राजकीय

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्याने त्यांच्या विरोधकांना सध्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविरोधात सध्या विविध पोस्ट फिरवल्या जात आहेत. यामध्ये दावा केला जात आहे की, मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन, असे शबाना आझमी म्हणाल्या होत्या. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

मोदीजी अगर प्रधानमंत्री बन गए तो देश छोडू दुंगी – शबाना आझमी.

सोबत शबाना आझमी यांचा फोटो दिला आहे. तसेच खाली म्हटले की, पाच वर्षांपूर्वी शाहरुख खाननेदेखील असेच म्हटले होते. त्यालाही सोबत घेऊन जा.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम शबाना आझमी यांनी असे काही म्हटले का याची पडताळणी केली. तेव्हा अशी कोणतीही बातमी आढळली नाही. उलट त्यांच्या नावे खोटे विधान पसरविल्याच्या बातम्या समोर आल्या.

महाराष्ट्र टाईम्सने 11 मे रोजी दिलेल्या बातमीमध्ये शबाना आझमी यांनी भारत सोडून जाण्याविषयी विधान केले नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, मी देश सोडणार असल्याची चर्चा निव्वळ अफवा आहे. फेक न्यूज ब्रिगेडची परिस्थिती दयनीय आहे. एखाद्या मुद्यावर चर्चा न करता, अशी खोटी बनावट माहिती पसवण्याचा उद्योग यांनी पुन्हा सुरू केलाय आणि देशातील जनताही अशा माहितीवर विश्वास ठेवते.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

एनडीटीव्हीनेदेखील पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीवरून ही बातमी दिली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खोट्या प्रचारचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, मुद्यांवर बोलायला तोंड नाही तर खोटं एवढं रेटून बोलायचं की, लोकं त्याला खरं मानतील. पण देशात बुलंद आवाज असणारे लोकदेखील आहेत जे खोटे उघड्यावर आणून त्यांना तोंडावर पाडतील.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

शबाना आझमी यांनी स्वतःदेखील ट्विट करीत देश सोडण्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यात लिहिले की, मी देश सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास देश सोडण्याचे वक्तव्य मी कधीही केलेलं नाही. याच देशात माझा जन्म झाला असून, येथेच माझा मृत्यू होईल.

अर्काइव्ह

मग शाहरुखने पाच वर्षांपूर्वी देश सोडून जाईल असे म्हटले होते का?

नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून शाहरुख खानच्या नावे वरीलप्रमाणे विधान सोशल मीडियावर पसरविले जात आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर मी भारत सोडून जाईल, असे शाहरुखने नाही तर कमाल आर. खान याने म्हटले होते. शाहरुखला SRK म्हटले जाते तर कमाल आर. खान स्वतःला KRK म्हणून घेतो. नावातील या साधर्म्यामुळे त्याने केलेले देश सोडण्याचे विधान शाहरुखच्या तोंडी घातले जाते.

कमालने 13 सप्टेंबर 2013 रोजी ट्विट करून म्हटले होते की, भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले. मी शब्द देतो की, मोदी पंतप्रधान झाले तर मी भारत सोडून जाईल.

अर्काइव्ह

जेव्हा शाहरुखच्या नावाने हे विधान फिरू लागले तेव्हादेखील कमालने ट्विट करून सांगितले की, मी भारत सोडून जाईल असे म्हणालो होतो. शाहरुख, सलमान किंवा आमीर खान असे म्हणाले नव्हते.

अर्काइव्ह

बेबी केआरके नावाच्या अकाउंटवरून या सेलिब्रेटीविरोधात खोटा प्रचार केला जात असल्याचेही त्याने ट्विट करून सांगितले होते.

अर्काइव्ह

शाहरुख खाननेदेकील 18 मे 2014 रोजी ट्विट करून त्याच्याविरोधातील अपप्रचाराचे तीव्र शब्दांत खंडन केले होते. त्याने लिहिले की, मी न केलेले ट्विट खरे मानणाऱ्या मुर्खांना सांगण्यास मला आनंद होते आहे की, त्या फेक ट्विटचमधील व्याकरण जितके खराब आहे तेवढेच तुमचे वर्तनदेखील वाईट आहे. आणि हे मी अत्यंत सौम्यपणे सांगतोय.

अर्काइव्ह

निष्कर्ष

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मी देश सोडून जाईल, असे शबाना आझमी किंवा शाहरुख खानने म्हटले नव्हते. त्यांच्या नावे हे खोटे विधान पसरविले जात आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सोडून जाईल, असे शबाना आझमी किंवा शाहरुख म्हणालाच नव्हता

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False