पाण्याबाहेर मासे आल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे; तो गोव्याच्या किनारपट्टीवरील नाही

Coronavirus False

कोरोना विषाणूच्या जागितक साथीमुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. मासेमारी व्यवसायावरदेखील याचा परिणाम दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर एक व्हिडियो चर्चेचा विषय ठरत आहे. पाण्यातून मासे बाहेर पडत असल्याचे यामध्ये दिसते. सोबत दावा केला जात आहे की, मासेमारी थांबल्यामुळे गोव्यातील बेतीम येथे मासे स्वतःहून बाहेर पडत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला.

काय आहे व्हिडियोमध्ये?

तीन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये मासे पाण्यातून उडी मारून किनाऱ्यावर येत आहेत. हजारोंच्या संख्येने मासे बाहेर पडण्याची ही घटना गोव्यातील बेतीम येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले की, मासेमारीचा हंगाम असूनसुद्धा कोणीही बाहेर काढीत नाही म्हणून मासे-बांगडे आणि पेडवे स्वतःहून बाहेर पडले स्थळ-बेतीम गोवा.

मूळ व्हिडियो पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सुरुवातीच्या काही सेकंदातच व्हिडियो चित्रित करणारा व्यक्ती वेगळ्याच भाषेत बोलतो. ती गोव्यातील स्थानिक भाषा नाही. त्यामुळे व्हिडियोबाबत शंका उपस्थित होते.

इन-व्हिड टूलच्या माध्यमातून की-फ्रेम्स निडवून मग गुगल आणि यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून हा व्हिडियो 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळले.

युट्यूबवर 13 सप्टेंबर 2018 रोजी हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. चीनी भाषेतील शीर्षकानुसार हा व्हिडियो हाँगकाँगच्या टाय पो भागातील सॅन्मेन्झाई येथील हा व्हिडियो आहे. तेथे मँगोस्टीन नावाच्या चक्रीवादळ येण्याची चाहू लागताच हे मासे पाण्याबाहेर उडी मारून बाहेर पडत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. याच माहितीसह हा व्हिडियो येथे पाहू शकता.

चीनमधील बायडू या सर्च इंजिनमध्ये चीन भाषेतून की-वर्ड्सद्वारे सर्च केले असता हा व्हिडियो हाँगकाँगमधील असल्याचे दिसून आले. चक्रीवादळ येण्यापूर्वी मासे असे बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. हे सर्व व्हडियो 13 ते 16 सप्टेंबर 2018 च्या आसपास अपलोड करण्यात आले होते. मग या काळात हाँगकाँगमध्ये चक्रीवादळ आले होते का याचा शोध घेतला.

चक्रीवादळाविषयी शोध घेतल्यावर कळाले की, हाँगमध्ये खरंच सप्टेंबर 2018 मध्ये चक्रीवादळ आले होते. हाँगकाँग वेधशाळेच्या अधिकृत वेबसाईटवरील पत्रकानुसार, 7 ते 17 सप्टेंबर 2018 दरम्यान मँगखुत (मँगोस्टीन) चक्रीवादळाचा हाँगकाँगला तडाखा बसला होता. हाँगकाँगमधील त्यावर्षीचे हे पाचवे वादळ होते. फिलिपाईन्स येथे 65 जणांचे बळी घेतल्यानंतर हे वादळ दक्षिण चीन आणि हाँगकाँगमध्ये दाखल झाले होते.

Baidu-1.png

मूळ सर्च रिझल्ट्स येथे पाहा – बायडू सर्च

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हायरल व्हिडियो गेल्या दोन वर्षांपासून उपलब्ध आहे. तो हाँगकाँगमधील एका गावातील. तेथे 2018 साली आलेल्या चक्रीवादळच्या वेळी हे मासे बाहेर पडले होते. हा व्हिडियो गोव्यातील नाही. त्यामुळे पोस्टमधील दावा खोटा आहे.

Avatar

Title:पाण्याबाहेर मासे आल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे; तो गोव्याच्या किनारपट्टीवरील नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False