
कोरोना विषाणूचा उगम कसा झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. चीनमधील वुहान प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला असे काही जण मानत असून, चीनने मुद्दामहून हा विषाणू पसरविला असा आरोप केला जात आहे. अद्याप याविषयी कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. आता तर जपानचे नोबेल विजेते शास्त्रज्ञदेखील असे म्हणत आहेत असा दावा केला जात आहे.
जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांच्या नावे विधान फिरत आहे की, कोरोना विषाणू चीनने तयार केला आहे. मी जर खोटा ठरलो तर माझे नोबेल पारितोषिक परत घ्या, असेही ते म्हणाल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
काय आहे पोस्टमध्ये?
एका बातमीचे कात्रण पोस्टमध्ये शेयर करण्यात आले आहे. त्यामध्ये तासुकू होंजो यांनी नोबेल पारितोषिक परत करण्याच्या शर्यतेवर म्हटले की, कोरोना विषाणू चीननेच तयार केला आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
जपानचे वैज्ञानिक डॉ. तासुकू होंजो यांना 2018 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवण्यासंबंधी केलेल्या संशोधनासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ते क्योटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
डॉ. होंजो यांनी जर खरोखरंच व्हायरल विधान केले असेल तर ती मोठी बातमी ठरेल. जगभरातील मीडिया त्याविषयी लिखाण करेल. परंतु, इंटरनेटवर एकही बातमी आढळली नाही, ज्यामध्ये डॉ. होंजो यांनी असे विधान केल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू संदर्भात त्यांनी आतापर्यंत दिलेल्या मुलाखतीमध्ये कुठेही विषाणू चीनने तयार केला असेल म्हटलेले नाही.
जपानमधील निक्की न्यूजला 13 एप्रिलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की, इटली, इंग्लंड आणि अमेरिकेसह अनेक देशांनी विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याऐवजी अर्थव्यवस्थेला महत्त्वा दिले. त्यामुळे विषाणूची साथ नियंत्रण आली नाही. या मुलाखतीमध्ये त्यांनी कुठेही चीनने कोरोना विषाणू तयार केला असे म्हटलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – तैवान न्यूज
निक्की एशियन रिव्ह्युवने 10 एप्रिल रोजी बातमी दिली की, कोरोनाच्या साथीमुळे जपानची आरोग्यसेवा किती कुचकामी आहे हे समोर आले अशी टीका डॉ. होंजो यांनी केली होती. क्योडो न्यूजने बातमी दिली की, डॉ. होंजो यांनी जपान सरकारला कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये कुठेही चीनचा कोरना निर्माण करण्याचा हात आहे असे त्यांनी म्हटलेले नाही.
व्हायरल पोस्टमध्ये असेही म्हटले की, डॉ. होंजो यांनी चीनमधील प्रयोगशाळेत 4 वर्षे काम केले. क्योटो विद्यापीठाच्या वेबसाईटवर डॉ. होंजो यांचा सीव्ही उपलब्ध आहे. यामध्ये त्यांना आतापर्यंत कुठे-कुठे काम केले याचा तपशील दिलेला आहे. त्याची तपासणी केली असता कळाले की, डॉ. होंजो यांनी चीनमधील कोणत्याही प्रयोगशाळेत काम केलेले नाही. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला हा दावादेखील असत्य आहे.
मग हे विधान व्हायरल का झाले?
इंटरनेटवर शोध घेतला असात कळाले आले की, फ्रान्समधील नोबेल पारितोषिक विजेते लुक माँटेग्नेर यांनी म्हटले होते की, चीनने कोरोना तयार केला आहे. फान्सच्या सी-न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते की, कोरोना विषाणूमध्ये एचआयव्ही एड्स आणि मलेरियाच्या विषाणूंचे गुणधर्म आढळतात. नैसर्गिकरीत्या असे होणे शक्य नाही. त्यामुळे हा विषाणू मानवनिर्मित असण्याची शक्यता आहे. वुहानमधील प्रयोगशाळेत अपघातामुळे हा विषाणू बाहेर पडल्याचाही त्यांनी दावा केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया
फ्रान्स सरकारने मात्र लगेच हा दावा फेटाळून लावला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या कार्यालयीत अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, कोरोना विषाणूचा उगम वुहान प्रयोगशाळेत झाला यासंबंधी कोणताही ठोस पुरावा नाही. अशा विधानांचे फ्रान्स सरकार समर्थन करीत नाही.
केवळ सरकारच नाही तर, इतर वैज्ञानिकांनीसुद्धा माँटेग्नेर यांचा दावा फेटाळून लावला आहे. पॅरिसमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ Etienne Simon-Loriere म्हणाले की, केवळ इतर विषाणूंशी साधर्म्य असणारे गुणधर्म आढळले म्हणजे तो मानवनिर्मित आहे, असे म्हणने चूक आहे. एका पुस्तकातील शब्द दुसऱ्या पुस्तकात सापडला तर याचा अर्थ होत नाही की, तो कॉपी-पेस्ट करण्यात आला.

मूळ बातमी येथे वाचा – सी-नेट
कोण आहेत माँटेग्नेर?
लुक माँटेग्नेर यांना 1983 साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. एचआयव्ही-1 रेट्रोव्हायरस शोधून काढल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून वैज्ञानिक क्षेत्राध्ये त्यांची प्रतिष्ठा कमी झालेली आहे. त्यांच्या लसीकरणाविरोधाती मतांमुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्यांच्या अनेक संशोधन प्रकल्पांना मंजुर मिळालेली नाही, अशी माहिती केंद्रीय पंजाब विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. फेलिक्स बस्त यांनी मेडियम आणि द वायर सायन्सवर लिहिलेल्या लेखात दिली. नेचर वेबसाईटवरील एका संशोधनामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, कोरोना विषाणू मानव निर्मित नसून, तो नैसर्गिकरीत्या तयार झालेला नाही. जगभरातील 27 वैज्ञानिकांनी पत्रक काढून सांगितले की, हा विषाणू मानवनिर्मित नाही.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, डॉ. तासुकू होंजो यांनी कोरोनाच्या उगमाविषयी कोणतेही विधान केलेले नाही. कोरोना विषाणू चीनने तयार केला असे ते म्हणालेच नाही. त्यांच्या नावे खोटे विधान फिरवले जात आहे. फ्रान्समधील नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने तसे विधान केले होते. परंतु, अनेक शास्त्रज्ञ आणि खुद्ध फ्रान्स सरकारने त्यांच्या दाव्यला फेटाळले आहे.

Title:“कोरोना चीनने तयार केला” असे जपानचे नोबेल विजेते शास्त्रज्ञ म्हणाले नाही; त्यांच्या नावे खोटे विधान व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
