हेमंत करकरे यांच्या पत्नीचे 2014 सालीच निधन झाले; ती बातमी आताची म्हणून नव्याने व्हायरल

Partly False सामाजिक

मुंबईमध्ये झालेल्या 26/11 दहशदवादी हल्ल्यामध्ये प्राणांची आहुती देणारे हेमंत करकरे यांची पत्नी कविता यांचे गेल्या रविवारी (4 ऑक्टोबर) निधन झाल्याचे मेसेज सध्या फिरत आहेत. संपूर्ण मीडिया राजकारण आणि खेळांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना या बातमीला महत्त्व द्यावेसे वाटले नाही, अशीदेखील टीका केली जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हायरल मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पडताळणीसाठी पाठवला. याबाबत माहिती घेतल्यावर कळाले की, कविता करकरे यांचे 2014 सालीच निधन झाले आहे.

काय आहे दावा?

व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, भारतीय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया हे राजकारण, खेळ आणि करमणूक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या बातम्यांवर लक्ष केंद्रित करण्यात व्यस्त आहे.  मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना मरण पावलेली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांची पत्नी श्रीमती कविता करकरे यांचे रविवारी सकाळी 57 व्या वर्षी निधन झाले. मीडियाने दखल घेतली नसेल तरी आपण जागरूक नागरिक म्हणून दखल घेऊन *दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.”

फेसबुकवरीदेखील हा मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हेमंत करकरे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी कसाबसह इतर दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यामध्ये हेमंत करकरे शहीद झाले. 

मग त्यांची पत्नी कविता यांचे निधन कधी झाले हे आम्ही तपासले. या शोधातून कळाले की, कविता करकरे यांचे 2014 सालीच निधन झाले होते. 

विविध दैनिकांनी त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. लोकसत्ताच्या बातमीनुसार, कविता करकरे यांचे 29 सप्टेंबर 2014 रोजी निधन झाले होते. दोन दिवसांआधी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मेंदूतील रक्तस्रावामुळे त्या कोमात गेल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर 29 सप्टेंबर 2014 रोजी सकाळी रुग्णालयाकडून त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

हेमंत करकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची कविता करकरे यांनी पोलिसांना अद्यावत शस्त्रास्त्र व सुविधा देण्यासाठी पाठपुरावा केला. कविता करकरे आपल्या तीन मुलांसह दादर येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास होत्या. त्या पेशाने शिक्षिका होत्या. मुंबईतील बी.ईड कॉलेजमध्ये त्या शिकवायच्या. 

एनडीटीव्ही वाहिनीनेसुद्धा कविता करकरे यांच्या निधनाची बातमी प्रसारित केली होती. कविता यांच्या दोन मुली व एक मुलगा यांनी त्यांच्या शरीरातील अवयव दान करण्यास रुग्णालयाला परवानगी दिली होती.

निष्कर्ष

हेमंत करकरे यांची पत्नी कविता यांचे गेल्या रविवारी निधन नाही झाले. त्यांचे तर सहा वर्षांपूर्वीच (2014) निधन झाले होते. त्यावेळी मीडियानेसुद्धा त्यांच्या निधनाची दखल घेत बातम्या केल्या होत्या.

यावरून स्पष्ट होते की, कविता करकरे यांच्या निधनाची जुनी बातमी आताची म्हणून पुन्हा पसरविण्यात येत आहे.

(तुमच्याकडील शंकास्पद मेसेज/फोटो/व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी 9049053770 या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर पाठवा आणि मिळवा सत्य माहिती 24 तासांच्या आत!)

Avatar

Title:हेमंत करकरे यांच्या पत्नीचे 2014 सालीच निधन झाले; ती बातमी आताची म्हणून नव्याने व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Partly False