पाँडिचेरी विद्यापीठाने कोरोनावर घरगुती उपाय शोधून काढल्याची फेक न्यूज व्हायरल

Coronavirus False

नऊ महिने झाले तरी कोविड-19 महारोगावर औषध किंवा लस विकसित झालेली नाही. त्यामुळे लोक मिळेल ते उपाय आणि मेसेजवर विश्वास ठेवत आहेत. अशाच एका मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाँडिचेरी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने कोविड-19 वर घरगुती उपाय शोधून काढला असून त्याला जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा (WHO) मान्यता दिली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही माहिती असत्य आढळली. खुद्द पाँडिचेरी विद्यापीठाने हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे दावा?

मेसेजमध्ये म्हटले की, “अखेरीस पाँडिचेरी विद्यापीठातील भारतीय विद्यार्थी रामला कोविड-19 चा घरगुती उपचार सापडला. ज्याला डब्ल्यूएचओने प्रथमच मान्यता दिली. त्याने सिद्ध केले की, एक चमचा मिरी पावडर, दोन चमचे मध आणि थोडासा आल्याचा रस सतत 5 दिवस घेतल्यास कोरोनाचा प्रभाव 100% पर्यंत दूर केला जाऊ शकतो. संपूर्ण जग हे उपचार घेण्यास प्रारंभ करीत आहे.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील मेसेजमध्ये खरे तर दोन दावे आहेत.

1. पाँडिचेरी विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या संशोधनाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली.

2. काळी मिरी पूड (Black Pepper), मध आणि आले (अद्रक) याने कोरोना 100 टक्के बरा होतो.

आता एक-एक करून दोन्हींची पडताळणी करूया.

पाँडिचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने खरंच कोविड-19 वर घरगुती उपाय शोधून काढला का याचा इंटरनेटवर शोध घेतला. तेव्हा अशी एकही बातमी आढळली नाही. पाँडिचेरी विद्यापीठाच्या वेबसाईटवरदेखील असे काही संशोधन झाल्याने नमूद नाही.


READ MORE


सदरील मेसेज सर्वप्रथम जुलै महिन्यात व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती. तेव्हा पाँडिचेरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गुरमीत सिंग यांनी मीडियाशी बोलताना हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. “सोशल मीडियावर फिरणारा तो मेसेज खोटा आहे. आमच्या कोणत्याही विद्यार्थ्याने कोविड-19 वर संशोधन केलेले नाही,” असे ते म्हणाले होते. 

यानंतर आम्ही जागितक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटला भेट दिली. तेव्हा कळाले की, WHO ने कोविड-19 साठी अद्याप कोणतेही औषध किंवा लसीला अधिकृत मान्यता दिलेली नाही.

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – WHO

मिरी पूड, मध आणि अद्रकने कोरोना बरा होतो का?

जसे की, जागतिक आरोग्य संघटनेने वर स्पष्ट केले की, कोविड-19 वर अद्याप कोणतेही ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. तरी काही पारंपरिक आणि घरगुती उपाय कोविड-19 ची सौम्य लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. परंतु, सरसकट तोच उपाय करावा, असे म्हणता येणार नाही.

मिरी पूड, मध आणि अद्रक हे खोकल्यावरील घरगुती उपाय आहेत. त्याने कोरोना बरा अथवा नष्ट होत नाही. या सगळ्या पदार्थांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असले तरी कोरोना विषाणूवर ते प्रभावी ठरत नाही.

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – WHO Myth Busters

कोविड-19 संदर्भात घरच्याघरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपाय करू नका. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने पुढील नियम सांगितलेले आहेत.

1. नियमित साबणाने किंवा सॅनिटायझरने हाथ स्वच्छ धुवा

2. नाक, तोंड आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नका

3. बाहेर व गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला

4. शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा

5. कायम एक मीटर एवढे शारीरिक अंतर पाळा

कोरोनाविषयक फॅक्ट क्रेसेंडोने केलेले सर्व फॅक्ट-चेक येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पाँडिचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने कोविड-19 वर घरगुती उपाय शोधून काढल्याचा दावा असत्य आहे.

(तुमच्याकडील शंकास्पद मेसेज/फोटो/व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी 9049053770 या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवरपाठवा आणि मिळवा सत्य माहिती 24 तासांच्या आत!)   

Avatar

Title:पाँडिचेरी विद्यापीठाने कोरोनावर घरगुती उपाय शोधून काढल्याची फेक न्यूज व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False