जुनेच फोटो शेअर करून मीडियाने म्हटले, की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युद्धभूमीवर उतरले; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह काबीज करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. या युद्धाच्या बातम्या देताना भारतीय न्यूज मीडिया जुने आणि असंबंधित व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असल्याचे दिसून येत आहे.

यातच भर म्हणून ‘लोकमत’च्या सोशल मीडिया अकाउंटवरून युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा लष्करी गणवेशातील फोटो शेअर दावा करण्यात आला की, “युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युद्धभूमीवर उतरले.”

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी लोकमतद्वारे हा फोटो ट्विट करण्यात आला होता. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो किमान एक वर्षे जुना असल्याचे आढळले.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – ट्विटर | अर्काइव्ह

‘लोकमत’च्या ट्विटचा आधार घेत फेसबुकवरदेखील युजर्स याच दाव्यासह हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

सोबत या फोटोवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबमधून परत जाण्यावरून टोमणेदेखील मारले जात आहे. 

तथ्य पडताळणी

रशियाने युक्रेन वरील आक्रमणाचे म्हणून जुने आणि प्रसंगी व्हिडिओ गेमच्या क्लिप शेयर केल्या गेलेल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने अशा अनेक व्हिडओ आणि फोटोंची पडताळणी केलेली आहे. ती तुम्ही येथे वाचू शकता.

या अनुभवावरून या फोटोची सत्य तपासण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले, की हा फोटो गेल्या वर्षापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

‘टाईम’ मॅगझीनच्या वेबसाईटवरील एका बातमीत झेलेन्स्की यांचा हा फोटो वापरण्यात आला आहे. 

मूळ बातमी – टाईम मॅगझीन

या फोटो खाली दिलेल्या कॅप्शनमध्ये स्पष्ट म्हटले आहे, की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर  झेलेन्स्की यांनी डॉनबास भागातील सैन्य छावणीला 9 एप्रिल 2021 रोजी भेट दिली होती. या भागात रशियाचे समर्थन असलेल्या फुटीरवादी गटाचा दबदबा आहे. 

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या जनसंपर्क विभागाने हा फोटो माध्यमांशी शेअर केला होता.

हाच फोटो अल जझिरा, युरेक्टिव्ह या वेबसाईटवरही 12 एप्रिल 2012 रोजीच्या बातम्यांमध्ये उपलब्ध आहे. 

सध्या काय परिस्थिती आहे?

रशियाच्या आक्रमाणाला घाबरून झेलेन्स्की देश सोडून पळाल्याच्या अफवा पसरू लागल्यानंतर झेलेन्स्की यांनी राजधानी किव्हमध्ये असल्याचा व्हिडिओ शेअर करून ते देशातच असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रपती भवनाच्या बाहेर उभा राहून काढलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी कुटुंबासह किव्हमध्येच थांबणार असल्याचे सांगितले. रशियन आक्रमणापासून किव्हचे रक्षण करण्याचे वचन देताना ते म्हणाले, की “मी देश सोडून पळून जाणार नाही. आम्ही सर्व येथे आहोत. आमचे सैन्य येथे आहे. आपल्या समाजातील नागरिक येथे आहेत. आम्ही सर्व येथे आमच्या स्वातंत्र्याचे, आमच्या देशाचे रक्षण करत आहोत, आणि कायम इथे असेच उभे राहू.” 

व्हिडिओत झेलेन्स्की यांनी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लष्करी पोशाख घातलेला असून ते त्यांचे पंतप्रधान, प्रमुख कर्मचारी आणि इतर सहाय्यकांसोबत उभे आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, झेलेन्स्की यांचा एक वर्षे जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल होत आहे. माध्यमांनी पडताळणी न करताच हा फोटो शेअर करून म्हटले की, रशियाविरोधातील युद्धात झेलेन्स्की स्वतः युद्धभूमीवर उतरले.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जुनेच फोटो शेअर करून मीडियाने म्हटले, की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युद्धभूमीवर उतरले; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False