DIVIDER IN CHIEF: टाईम मॅगझीनचे पत्रकार आतिश तासिर काँग्रेसचे जनसंपर्क अधिकारी आहेत का?

False आंतरराष्ट्रीय राजकीय

अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम मॅगझीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुखपृष्ठावर स्थान देत भारतात दुफळी निर्माण करणारा नेता (Divider In Chief) म्हटले आहे. या लेखामुळे सध्या प्रचंड वाद सुरू आहेत. हा लेख ज्यांनी लिहिला ते पत्रकार आतिश तासीर यांच्याविषयी नाना प्रकारचे दावे केले जात आहेत. ते काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क अधिकारी असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यासाठी विकीपीडियावरील त्यांच्या पेजवरील माहितीचा स्क्रीनशॉट दिला जातो. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये युजरने म्हटले की, आतिश तासीर हा एक पाकिस्तानी राजनेता आणि उद्योगपतीचा मुलगा आहे. म्हणून त्याने मोदी वर TIME MAZGINE मध्ये लिहिलेला मोदीद्वेष आपण भारतीय लोक समजू शकतो. सोबत विकिपीडिया पेजचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. त्यामधील माहितीनुसार, आतिश तासीर हे सध्या काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क व्यवस्थापक (PR Manager) म्हणून काम करतात.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये विकिपीडिया पेजचा स्क्रीनशॉट दिलेला असल्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने आतिश तासीर यांचे विकीपीडिया पेज तपासले. त्यावर कुठेही ते काँग्रेस पक्षासाठी काम करत असल्याचा उल्लेख आढळला नाही. मूळ विकिपीडिया पेज आणि फेसबुकवरील स्क्रीनशॉट यांनी एकमेकांसमोर तुलना करून पाहू. डावीकडे फेसबुक पोस्टमधील स्क्रीनशॉट आहे तर, उजवीकडे मूळ विकिपीडिया पेज. पोस्टमधील स्क्रीनशॉटमध्ये तासीर यांनी पत्रकार म्हणून कोणकोणत्या विविध मीडिया कंपन्यांसाठी काम केले आहे याची माहिती दिली आहे. विविध मॅगझिन, दैनिकांचे (Esquire) नाव नमुद केल्यावर सध्या ते काँग्रेस पक्षाचे पीआर मॅनेजर म्हणून काम पाहतात, असे लिहिलेले आहे. मूळ विकिपीडिया पेजवर मात्र Esquite नंतर तशी काही ओळच नाही.

मूळ विकिपीडिया पेज येथे पाहा – आतिश तासीर

याविषयी अधिक माहिती घेतली असता फर्स्टपोस्टवरील एक बातमी आढळली. यानुसार टाईम मॅगझीनमधील वादग्रस्त लेख ज्या दिवशी प्रसिद्ध झाला त्या 10 मे रोजी आतिश तासीर यांच्या विकिपीडिया पेजमध्ये अनेक वेळा एडिट करून बदल करण्यात आले. एकाच दिवसात त्यांचे पेज 78 वेळा एडिट करण्यात आले. कोणीदेखील विकिपीडियावरील माहिती एडिट करू शकतो. त्यांच्याविषयी खोटी माहिती विकिपीडिया पेजवर टाकून त्यांची बदनामी करण्यात आली.

एका पेजवर एवढे बदल होताना पाहून विकिपीडियाने आता या पेजवरील सर्वांसाठीचा एडिटचा पर्याय बंद केला आहे. पेज प्रोटेक्ट करण्यात आले असून यापुढील एडिट योग्य पडताळणी केल्यानंतरच करता येणार.

मूळ बातमी येथे वाचा – फर्स्टपोस्टअर्काइव्ह

म्हणजे वादग्रस्त लेख प्रकाशित होताच आतिश तासीर यांचे विकिपीडिया पेज बदलण्यात आले. पेजची एडिट हिस्ट्री पाहिल्यावर दिसते की, 10 मे रोजी 8.39 वाजता एकाने आतिश तासीर पाकिस्तानी मुस्लिम लेखक असल्याचे लिहिले होते. परंतु, लगेच ही चुकीची माहिती दुरुस्त करून ते इंग्लंडमध्ये जन्मलेले पत्रकार असे लिहिण्यात आले. याचा अर्थ की, त्यांच्या विकीपीडिया पेजला एडिट करून त्यांच्याविषयी खोटी माहिती पसरविण्यात आली.

मूळ वेबसाईट येथे पाहा – एडिट हिस्ट्री

आतिश तासीर यांची आई भारतीय पत्रकार तवलीन सिंग असून त्यांचे पिता पाकिस्तानी व्यावसायिक आणि राजकीय नेते सलमान तासीर होते. जगभरातील प्रतिष्ठित दैनिक, नियतकालिके आणि संकेतस्थळांसाठी आतिश लिखाण करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना अमेरिकेचे ग्रीन कार्डदेखील मिळाले आहे.

निष्कर्ष

आतिश तासीर यांच्या विकिपीडिया पेजवरील माहितीला खोडसाळपणे एडिट करून ते काँग्रेस पक्षाचे पीआर मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे म्हटले आहे. ही माहिती असत्य आहे.

Avatar

Title:DIVIDER IN CHIEF: टाईम मॅगझीनचे पत्रकार आतिश तासिर काँग्रेसचे जनसंपर्क अधिकारी आहेत का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False