
भारतासारख्या विशाल आणि लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात बेशिस्त आणि त्यातून निर्माण होणारी गैरसोय ही मोठी समस्या आहे. रेल्वेच्या प्रवासात तर याचा प्रत्यय हमखास येतो. मुंबईत राहणाऱ्यांना आणि गणपतीला कोकणात जाणाऱ्यांना रेल्वेतील गर्दीचा चांगलाच अनुभव असतो. अशाच गर्दीचा एक मजेशीर व्हिडियो सोशल मीडियावर पसरत आहे. या व्हिडियोमध्ये रेल्वे डब्याच्या टपावर बसलेले प्रवासी खांबाच्या आधारे खाली उतरताना दिसतात. या व्हिडियोच्या माध्यमातून डिजिटल इंडियातील बुलेट ट्रेनवर उपरोधात्मक टीका करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
व्हायरल इंडिया नावाच्या पेजने 20 जून रोजी शेयर केलेल्या सुमारे एक मिनिटाच्या क्लिपमध्ये गर्दीने खचाखच भरलेली ट्रेन दिसते. रेल्वे डब्याच्या टपावर बसलेल्या शेकडो प्रवासी एका खांबाच्या साह्याने खाली उतरत आहेत. सोबत कॅप्शन दिले की, बुलेट ट्रेनवरून खाली उतरताना डिजिटल इंडियामधील नागरिक.
तथ्य पडताळणी
हा व्हिडियो नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती पोस्टमध्ये देलेली नाही. त्यामुळे व्हिडियोची सत्यता तपासण्यासाठी त्यातील की-फ्रेम निवडूण गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडियो गेल्या एका वर्षापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. सदरील व्हिडियो बांगलादेशमधील असल्याचे कळते. युट्यूबवर उपलब्ध असलेल्या विविध व्हिडियोमध्ये ही ट्रेन बांग्लादेशमधील असल्याचे म्हटले आहे. उदाहरणार्थ खालील व्हिडियो पाहा.
हा धागा पकडून शोध घेतला असता, शटरस्टॉक या फोटो वेबसाईटवर खालील फोटो आढळला. त्याच्यासोबत दिलेल्या माहितीनुसार, ही बांग्लादेशमधील ट्रेन आहे. बांग्लादेशीमधील रेल्वेमध्ये प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. येथील रेल्वेप्रवास तुलनेने फार स्वस्त आहे. यामध्येसुद्धा लोक टपावर बसलेले आहेत.

मूळ फोटो येथे पाहा – शटरस्टॉक
या फोटोची तुलना पोस्टमधील व्हिडियोतील रेल्वेशी केली असता साधर्म्य आढळून येते. सर्वप्रथम दोन्ही रेल्वेचा रंग (हिरवा) आणि त्यावरील डिझाईन (दोन पिवळ्या रेषा) सारखीच आहे. दोन्ही रेल्वेच्या खिडक्या सारख्याच आहेत. दोन्ही ट्रेनवर बांग्ला भाषेतून “बांग्लादेश रेल्वे” असे लिहिलेले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, ही रेल्वे भारतातील नाही. ती बांग्लादेशमधील आहे.

निष्कर्ष
सोशल मीडियावर व्हायरल होत असेलेला व्हिडियो बांग्लादेशमधील आहे. त्यामुळे हा व्हिडियो भारतातील असल्याचा दावा चुकीचा ठरतो.

Title:बांग्लादेशमधील रेल्वेच्या गर्दीचा व्हिडियो भारतातील म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
