इंदिरा गांधींनी सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले नव्हते. वाचा या फोटोमागील सत्य

False राजकीय

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाबत (जेएनयू) अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. अशाच एका दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी 1981 साली ‘जेएनयू’तील आंदोलन दडपण्यासाठी तेव्हाचे विद्यार्थी नेते सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. एवढेच नाही तर त्यांना सर्वांसमक्ष राष्ट्रगीतसुद्धा म्हणायला लावले होते, असा दावा केला जात आहे. यावेळीचा फोटो म्हणून इंदिरा गांधी व विद्यार्थ्यांचे एक कृष्णधवल छायाचित्र शेयर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमधील फोटोत विद्यार्थ्यांच्या घोळक्यात इंदिरा गांधी उभ्या आहेत. सीताराम येचुरी त्यांच्यासमोर काही तरी वाचत असल्याचे दिसते. कॅप्शनमध्ये लिहिले की, जेएनयूमध्ये 1981 साली विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केले होते, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी जेएनयू विद्यापीठ 46 दिवस बंद ठेवून हॉस्टेलमध्ये घुसून पोलिस कारवाई केली होती. ससीताराम येचुरी यांना माफी मागायला लावून राष्ट्रगीत म्हणायला लावले होते

Rex Baba Sitaram yechuri FB Claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

हे छायाचित्र गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हिंदूस्थान टाईम्स  आणि इंडिया रेझिस्ट या संकेतस्थळावरील हा फोटो आढळला. फोटोखालील ओळीत लिहिले आहे की, इंदिरा गांधी यांच्यासमोर 5 सप्टेंबर 1977 रोजी विद्यार्थी नेते सीताराम येचुरी निवेदन वाचून दाखवत आहेत. विद्यापीठाच्या कुलपती (चांसलर) म्हणून इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. 

screenshot-indiaresists.com-2020.01.11-11_21_12.png

Archive

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संकेतस्थळावरील सीताराम येचुरीच्या प्रोफाईलनुसार 1977-78 या काळात जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. आउटलूकच्या एका लेखामध्ये या घटनेविषयी माहिती देण्यात आलेली आहे. 1977 साली आणीबाणी मागे घेतल्यानंतर झालेल्या निडवणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. तरीदेखील त्या ‘जेएनयू’च्या कुलपतीपदावर कायम राहिल्या होत्या. याचाविरोध करण्यासाठी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे तत्कालिन अध्यक्ष सीताराम येचुरी यांनी आंदोलन केले होते. 

आधी कुलगुरुंना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांनी 5 सप्टेंबर 1977 रोजी इंदिरा गांधी यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली होती. थोड्या वेळाने इंदिरा गांधी बाहेर आल्या. मग येचुरी यांनी इंदिरा गांधींनी कुलपतीपदाचा राजीनामा देण्याची मागणी करणारे निवेदन वाचले होते. हा फोटो त्यावेळी काढण्यात आला होता.

मूळ लेख येथे वाचा – आऊटलूक

निष्कर्ष 

याचाच अर्थ की, सदरील फोटोत इंदिरा गांधी यांनी सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले नव्हते. याउलट, इंदिरा गांधींनी ‘जेएनयू’च्या कुलपतीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन सीताराम येचुरी या फोटोत वाचत आहेत. त्यामुळे या फोटोसोबत केला जाणारा दावा खोटा आहे.

Avatar

Title:इंदिरा गांधींनी सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले नव्हते. वाचा या फोटोमागील सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False