शेडसोबत हवेत उडालेल्या माणसाचा व्हिडियो 2018 मधील आहे. तो निसर्ग वादळाचा नाही.

False सामाजिक

निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर तडाखा दिल्यानंतर त्याच्या झंझावाताचे अनेक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर होऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये शेडला धरून उभा असलेला एक व्यक्ती वादळामुळे हवेत ओढला जातो. हा व्हिडियो निसर्ग वादळाचा असल्याचा दावा केला जाता आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता, हा व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे कळाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

पोस्टमध्ये शेयर केलेल्या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडियोमध्ये एक व्यक्ती शेडला धरून उभा आहे. वेगवान वाऱ्यामुळे ते शेड हवेत उडते. त्यामुळे त्याला धरून उभा असलेला व्यक्तीदेखील त्याच्यासोबत हवेत खेचला जातो. कसाबसा तो व्यक्ती परत खाली उतरून निघून जातो. हा व्हिडियो निसर्ग वादळातील असल्याचे म्हटले जात आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुकअर्काइव्ह

महाराष्ट्र टुडे (अर्काइव्ह) या वेबसाईटनेदेखील हा व्हिडियो शेयर केला आहे. 

न्यूज18 लोकमत (अर्काइव्ह) आणि मराठी मार्ग (अर्काइव्ह) वेबसाईटनेदेखील हा व्हिडियो निसर्ग वादळादरम्यानचा असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवर देखील हा व्हिडियो शेयर केला जात आहे.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

निसर्ग वादळाच्या नावाखाली शेयर होणाऱ्या व्हिडियोंपैकी अनेक व्हिडियो जुने असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीच समोर आणलेले आहे. त्यामुळे या व्हिडियोचेदेखील सत्य तपासणे गरजेचे आहे.

गुगलवर “man holding a shed in storm” असे सर्च केले असता SWNS नावाच्या युट्यूब चॅनेलवर गेल्या वर्षी 15 मे 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडियो आढळून आला. विशेष म्हणजे फेसबुकवर व्हायरल होत असलेली क्लिप केवळ 17 सेकेंदाची आहे तर हा युट्यूब व्हिडियो त्याहून अधिक लांबीचा 48 सेंकदाचा आहे.

वरील व्हिडियो बारईकाने निरीक्षण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात.

1. ही एक सीसीटीव्ही फुटेज आहे.

2. व्हिडियोमध्ये ऐकू येणारे लोक ज्याप्रकारे बोलत आहेत त्यानुसार हा व्हिडियो पंजाब-हरियाणा भागातील असावा.

3. व्हिडियोमध्ये वरच्या उजव्या कोपऱ्यात 16 व्या सेकंदाला 1 जून 2018 ही तारीख दिसते.

याचा अर्थ की, हा व्हिडियो 2018 मध्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. अधिक सर्च केले असता, फिरकी नावाच्या एका फेसबुक पेजवर 10 जून 2018 रोजी शेयर केलेला खालील व्हिडियो आढळला. 

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

निष्कर्ष

शेडसोबत हवेत उडून जाणाऱ्या माणसाचा हा व्हिडियो निसर्ग वादळादरम्यानचा नाही. हा व्हिडियो 1 जून 2018 रोजी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. व्हिडियोचे नेमके स्थान अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, हा व्हिडियो जुना आहे, हे नक्की.

Avatar

Title:शेडसोबत हवेत उडालेल्या माणसाचा व्हिडियो 2018 मधील आहे. तो निसर्ग वादळाचा नाही.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False