Fact Check : कुर्दिश मुलींचा फोटो देश की बेटिया म्हणून व्हायरल

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

आज पाहूया आपल्या देशातील या मुलींसाठी कोण जय हिंद लिहितं, अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पंकज बळी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी या फोटोला सत्य मानत त्याखाली जय हिंद म्हटले आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

या मुली खरंच भारतीय लष्करात आहेत का? असल्यास या मुलींना किमान वयाची काही अट नसेल का? असे अनेक प्रश्न आम्हाला पडले. या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आम्ही गुगलवर Indian army woman recruitment असे सर्च केले. त्यावेळी आम्हाला जागरण जोश या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार वयाच्या 17 वर्षापासून तुम्ही सैन्यात भरती होऊ शकता. त्यानंतर आम्ही भारतीय लष्कराची भरती प्रक्रिया करणाऱ्या joinindianarmy.nic.in या संकेतस्थळास भेट दिली. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पदावर भरती होण्यासाठी वयाची किमान पात्रता वेगवेगळी आहे. 

भारतीय लष्करात भरती होण्याचे संकेतस्थळ / Archive 

किमान वयाच्या पात्रतेत या मुली बसत असाव्यात, अशी शक्यता असल्याने आम्ही रिव्हर्स इमेज सर्चच्या सहाय्याने हा फोटो शोधला. त्यावेळी खालील परिणाम समोर आला.  

यातील Kurdish Patroit या युजरने हा फोटो pinterest वर Kurds and Kurdistan मध्ये सेव्ह केला असल्याचे दिसून आले. त्याखाली Kurdish warriors असे लिहिले असल्याचे दिसून आले. या फोटोच्या एका कोपऱ्यात एक लोगो आम्हाला दिसून आला.

हा लोगो नेमका कसला आहे आणि कुठला आहे, असा प्रश्न आम्हाला पडला. त्याचाही आम्ही रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला. तेव्हा हा लोगो HSNB चा असल्याचे लक्षात आले. HSNB च्या ट्विटर अकाऊंटवर Bethnahrin Women Protection Force चे अधिकृत ट्विटर अकाऊंट असल्याचे म्हटले आहे.  त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आम्ही हा फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा फोटो आढळून आला नाही. Bethnahrin Women Protection Force काय आहे याचा आम्ही विकीपीडियावर शोध घेतला. त्यावेळी आयएसआयएसच्या दहशतवादी कारवायांविरुध्द लढणारी ही एक लष्करी चळवळ असल्याचे या माहितीत म्हटले आहे. सीरियातील अनेक भागांवर या चळवळीचे आता नियंत्रण आहे. Bethnahrin Women Protection Force च्या फेसबुक अकाऊंटवर हा फोटो 18 जून 2016 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या मुली Bethnahrin Women Protection Force अन्य फोटोतही दिसतात. युध्दग्रस्त आणि यादवीग्रस्त भागातील ही चळवळ असल्याने ही अकाऊंटस कदाचित व्हेरिफाईड नसावीत, असे दिसून येते. 

निष्कर्ष

सीरियाच्या यादवी आणि युध्दग्रस्त भागातील Bethnahrin Women Protection Force च्या सैन्यातील या मुली आहेत. या मुली भारतीय लष्करात या मुली असल्याचा कोणताही पुरावा आढळत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : कुर्दिश मुलींचा फोटो देश की बेटिया म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False