दिल्ली सरकारने ध्रुव त्यागी आणि अंकित सक्सेना यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही का?

False राजकीय | Political

झारखंड येथे काही दिवसांपूर्वी तबरेज अन्सारी यांची हत्या करण्यात आली. दिल्ली वक्फ बोर्डाने त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यावरून अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारवर टीका केली जात आहे की, त्यांनी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी हत्या झालेल्या अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी यांच्या कुटुंबांना एकाही रुपयाची मदत केली नाही. कारण ते हिंदु आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

कपिल मिश्रा यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट फेसबुक पोस्टमध्ये 2 जुलै रोजी शेयर करण्यात आला होता. यामध्ये म्हटले की, केजरीवाल सरकारने झारखंडमध्ये ज्याला लोकांनी मारले त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये आणि पत्नीला सरकारी नोकरी देऊ केली आहे. कारण मृत पीडित मुस्लिम होता. परंतु, ध्रुव त्यागी आणि अंकित सक्सेना यांची दिल्लीमध्येच हत्या होऊनही त्यांच्या कुटुंबाला दिल्ली सरकारने एका रुपयाची मदत केली नाही. कारण ते हिंदू होते.

तथ्य पडताळणी

फेसबुक पोस्टमध्ये शेयर करण्यात आलेले ट्विट कधी करण्यात आले याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे सर्वप्रथम मूळ ट्विटचा शोध घेतला. दिल्लीतील करवाल नगरचे आमदार कपिल मिश्रा यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सदरील ट्विट 26 जून 2019 रोजी करण्यात आले होते. मूळ ट्विट खाली एम्बेड केलेले आहे. तबरेज अन्सारीच्या पत्नीला दिल्ली वक्फ बोर्ड पाच लाख रुपये आणि नोकरी देणार, अशी आज तकने बातमी दिली होती. या बातमीची लिंक रिट्विट करीत मिश्रा यांनी दिल्ली सरकारने ध्रुव त्यांनी आणि अंकित सक्सेना यांना मदत न केल्याचा आरोप केला होता.

https://twitter.com/KapilMishra_IND/status/1144129777348952065

अर्काइव्ह

गुगलवर शोध घेतला असता हिंदुस्थान टाईम्स आणि द हिंदु वेबसाईटची 28 जून रोजीची एक बातमी आढळली. यामध्ये स्पष्ट म्हटले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 27 जून रोजी अंकित सक्सेना आणि ध्रुव यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सौरभ भारद्वाज आणि गिरीश सोनी उपस्थित होते. या तिघांनी दोन्ही पीडित कुटुंबांच्या घरी जाऊन सांत्वन केले.

मूळ बातमी येथे पाहा – द हिंदुअर्काइव्ह

आप पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सिसोदिया यांनी पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेल्या भेटीचे फोटो शेयर करण्यात आले आहेत. त्यांनी लिहिले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आमदार सौरभ भारद्वाज यांनी स्वर्गीय अंकित सक्सेनाच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारतर्फे 15 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तसेच त्यांना हरप्रकारची मदत करण्याचे आश्वासनही दिले.

अर्काइव्ह

न्यूज 18 हिंदी आणि नवभारत टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, अंकित सक्सेनाच्या वडिलांनी सिसोदिया यांच्याकडे विनंती केली की, जेथे अंकितची हत्या झाली होती तेथील चौक/रस्त्याला त्याचे नाव देण्यात यावे. ती मागणी मान्य करून सिसोदिया यांनीदेखील यादृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी स्थानिक आमदार गिरीश सोनी यांना त्वरित यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. पुढच्या दहा दिवसांत बैठक बोलावून या प्रस्तावाला मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिला.

मूळ बातमी येथे वाचा – नवभारत टाईम्स

यावरून हे स्पष्ट होते की, दिल्ली सरकारने पीडित अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत केलेली आहे. मग कपिल मिश्रा यांनी असे ट्विट का केले?

कपिल मिश्रा यांनी 26 जुन रोजी दिल्ली सरकारवर टीका करणारे सदरील ट्विट केले होते. दिल्ली सरकारने अंकित आणि ध्रुव यांच्या कुटुंबांना 27 जून रोजी आर्थिक मदत केली. ही मदत जाहीर केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी 27 जून रोजी ट्विट करून दिल्ली सरकारने मदत केल्याचे मान्य केले होते. त्यांनी लिहिले की, अभिनंदन मित्रांनो! आपल्या दबावामुळे दिल्ली सरकारला अखेर अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी यांच्या कुटुंबाला मदत करावीच लागली. आपल्या एकत्रित मतदानाच्या शक्तीचा हा विजय आहे.

अर्काइव्ह

निष्कर्ष

फेसबुक युजरने कपिल मिश्रा यांनी 26 जून रोजी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट 2 जुलै रोजी शेयर केला. दिल्ली सरकारने मात्र 28 जून रोजीच अंकित आणि ध्रुव यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत केली होती. त्यामुळे दिल्ली सरकारने त्यांना एकाही रुपयाची मदत न केल्याचा दावा आता खोटा ठरतो.

Avatar

Title:दिल्ली सरकारने ध्रुव त्यागी आणि अंकित सक्सेना यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False