विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

False राजकीय | Political

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा सरकार बदलणार की, कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी वृत्तवाहिन्या ओपिनियन पोलद्वारे मतदारांचा कल चाचपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा एक जनमत चाचणीत एबीपी न्यूज चॅनेलने येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला 205 जागा मिळण्याची शक्यता वर्तिविल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमध्ये एबीपी न्यूज चॅनेलच्या ‘महाराष्ट्र का ओपिनियन पोल’ सर्व्हेक्षणाचा स्क्रीनशॉट देण्यात आला आहे. यामध्ये वंचित आघाडीला 205 जागा मिळणार असे दाखविले आहे. तसेच भाजप-सेनेच्या युतीला 55 तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 28 जागा मिळतील असे लोकांनी मत व्यक्त केले. एकुण 288 जागांच्या विधानसभेत वंचितचे पारडे जड राहणार, असे यातून दिसते. सदरील पोस्ट पडताळणी करेपर्यंत 8.6 हजार लाईक्स व 851 वेळा शेयर करण्यात आली होती.

तथ्य पडताळणी

एबीपी न्यूज हे हिंदी चॅनेल आहे. त्यावर असा काही सर्व्हे झाला का याचा शोध घेतला. तेव्हा 22 सप्टेंबर रोजीची बातमी आढळली. यामध्ये महाराष्ट्र विधानसभेत भाजप-शिवसेनेच्या युतीला 205 जागांवर यश मिळण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. सोबत काँग्रेच्या आघाडीला 55 तर इतर पक्षांच्या वाट्याला 28 जागा येतील असे म्हटले आहे. यामध्ये वंचित बहुज आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील याविषयी कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही.

मूळ बातमी येथे वाचा – एबीपी न्यूजअर्काइव्ह

एबीपीच्या जनमत चाचणीनुसार, भाजपला 46 टक्के तर काँग्रेसला 30 टक्के मतदान मिळणार. इतर पक्षांना 24 टक्के मतदारांची पसंती मिळेल. एबीपीने सी-व्होटर संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले होते. याच बातमीत चॅनेलने केलेल्या पोलचा स्क्रीनशॉटदेखील आहे. त्याची पोस्टमधील स्क्रीनशॉटशी तुलना केल्यावर लगेच कळते की, वंचितला 205 जागा दाखवणारा स्क्रीनशॉट फोटोशॉप केलेला (एडिट) केलेला आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका.

भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होणार की नाही, याबाबत अद्याप संदिग्धता आहे. दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढण्याचे ठरविले तर भाजपला फारसे नुकसान होणार नाही, असे या पोलमधून दिसते. उलट सेनेलाच याचा फटका बसण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढल्यास भाजप 144 तर सेनेला केवळ 39 जगांवर यश मिळेल, असे पोलमध्ये म्हटले आहे. चॅनेलवर यासंबंधी कार्यक्रमदेखील घेण्यात आला होता. तो तुम्ही खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये पाहू शकता.

निष्कर्ष

एबीपी न्यूज – सी व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभेत 205 जागा मिळतील असे दाखविलेले नाही. एबीपीच्या सर्वेक्षणाचे आकडे फोटोशॉप करून असा खोटा पोल शेयर केला जात आहे. एबीपीच्या पोलमध्ये भाजपला 205 जागा मिळतील असे म्हटले आहे. त्यामुळे ही पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False