FAKE ALERT: मोतीलाल वोरा हे काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्ष नाहीत. जाणून घ्या सत्य

False राजकीय | Political

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवे अध्यक्ष कोण याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, काँग्रेसने तरुण नेतृत्त्वाला नाकारून मोतीलाल वोरा यांना हंगामी अध्यक्षपद देऊन पक्षाची सुत्रे त्यांच्या हाती दिली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राहिलेल्या मोतीलाल यांनी वयाची नव्वदी पार केलेली आहे. यावरून काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक युजर्स लिहितात की, 50 वर्षांच्या राहुल गांधींनी काँग्रेस पक्षामध्ये नवा जोश, नवी ऊर्जा भरण्यासाठी 91 वर्षांचे ‘तरुणतुर्क’ मोतीलाल वोरा यांना हंगामी अध्यक्षपद बनविले.

तथ्य पडताळणी

गुगलवर शोध घेतला असता काँग्रेस पक्षाने अधिकृतरीत्या हंगामी अध्यक्षाची निवड जाहीर केलेली नाही. आम्ही पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट आणि वेबसाईटवर तपासणी केली. तेथे यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षाची निवड ही मोठी बातमी आहे. ती करण्यात आली असती तर नक्कीच सर्व माध्यमांमध्ये यासंबंधी बातमी प्रसिद्ध झाली असती. परंतु, तसे काही आढळून आले नाही.

इंटरनेटवरील बातम्यांनुसार, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या पदावर कोणाची वर्णी लागते याची चर्चा सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे नाव आघाडीवर आहे. दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या वोरा यांच्याकडे नवीन अध्यक्षाची निवड करेपर्यंत हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. परंतु, अद्याप अशी काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

यासंदर्भात वोरा यांना विचारले असता त्यांनी हंगामी अध्यक्ष झाल्याचे वृत्त फेटाळले. लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपवली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. बुधवारी मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे वृत्त समोर आले होते. परंतु वोरा यांनी या वृत्ताचे खंडन करत आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने वोरा यांच्याशी बोलून ही माहिती घेतली होती.

अर्काइव्ह

मोतीलाल वोरा जर हंगामी अध्यक्ष नाहीत तर मग कोण आहेत?

काँग्रेस पक्षाने हंगामी अध्यक्ष किंवा राहुल गांधी यांच्यानंतर पार्टी अध्यक्ष कोण असणार यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषण केलेली नाही. इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या सुत्रांनी माहिती दिली की, नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत राहुल गांधी हेच अध्यक्ष राहू शकतात. वोरा यांना हंगामी अध्यक्ष केले जाऊ शकते, ही माहितीदेखील असत्य असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्सअर्काइव्ह

निष्कर्ष

ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांना काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले नाही. त्यांच्या नावाची केवळ चर्चा आहे. स्वतः वोरा यांनी याबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FAKE ALERT: मोतीलाल वोरा हे काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्ष नाहीत. जाणून घ्या सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False