हिंदू महिलेला बुरखा घालूनच बसमध्ये येण्यास मुस्लिम महिलांनी सक्ती केली का? वाचा सत्य

False Social

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसमधून प्रवास करताना बुरखा घातलेल्या मुली साडी घातलेल्या एका महिलेवर ओरडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुस्लिम मुलींनी या महिलेने बुरखा घातला नसल्यामुळे बसमधून बाहेर जाण्यास सांगितले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. तसेच या घटनेला विनाकारण सांप्रदायिक रंग दिला जात आहे.

काय आहे दावा ?

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, ही केरळमधील घटना आहे. “मुस्लिम महिला प्रवाशांचे म्हणणे आहे की ते महिलांना बुरख्याशिवाय बसमध्ये प्रवेश देणार नाहीत. आता हिंदूंना आपले डोके झाकून घ्यावे लागेल आणि नंतर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना कोणत्याही टीव्ही चॅनेलने आणि कोणत्याही वर्तमानपत्राने कव्हर केलेली नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओमधील भाषेवरून कळाले की, ही भाषा केरळमधील कासारगोड जिल्ह्यात बोलली जाते.

हा धागा पकडून आम्ही आधिक शोध घेतल्यावर त्या भागातील बस कंडक्टर हरीश यांच्याशी संपर्क साधला. हरीश यांनी सांगितले की, “ही घटना 20 ऑक्टोबर रोजी कुंबलम-मुलेरिया मार्गावर घडली होती. त्या दिवशी व्हिडिओमधील महिलेने बुरखाधारी मुली बस स्थानक नसलेल्या ठिकाणी का थांबवायला सांगितले? असा सवाल केला होता. मुलींना या प्रश्नाचा राग आला असावा आणि तेव्हा हा वाद सुरू झाला. मुलींनी वृद्ध महिलेच्या वयाचा विचार न करता त्यांच्या सोबत असभ्य भाषा वापरण्यात आली होती. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली केली होती, मात्र ती दाखल केली नसल्याचे समोर आले. या ठिकाणी प्रत्येकजण ज्यांना प्रवास करायचा आहे, ते बसमध्ये चढू शकतात. कोणताही प्रवासी कोणालाही बसमधून बाहेर काढू शकत नाही. व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे.”

सदरील महितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर रिपोर्ट या वेबसाइटवर बातमी आढळली की, “कुंबलम-मुलेरिया मार्गावरील भास्कर नगर येथे बसस्थानकावर बसेस न थांबता पुढे निघून जातात. अशा घटना वारंवार होत असल्याने 22 ऑक्टोबर रोजी सध्यांकाळी विद्यार्थिनींनी बस अडवली होती. या ठिकाणी बस कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीमध्ये बाचाबाचीदेखील झाली होती. यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.”

वृद्ध महिलासोबत वाद झाल्याच्या आधीचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकतात. या ठिकाणी महिला विद्यार्थींनी बस थांबत त्याला जाब विचारत आहेत.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने कुंबलम पोलिस स्टेशनशी संपर्क साधल्यावर पोलिस निरीक्षक अनूब कुमार यांनी सांगितल की, बुरखा घातलेल्या या मुली कन्नूर विद्यापीठांतर्गत असलेल्या खानसा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. महाविद्यालयासमोर आरटीओचे बस स्टॉप होता. रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा एक भाग म्हणून त्यांना तात्पुरते वेटिंग शेड बसवण्यात आले होते. मात्र या ठिकाणी अनेकदा बस न थांबता पुढे निघून जात होत्या. त्यामुळे या विद्यार्थांनी वाटेचत बस थांबवल्या होत्या. तेव्हा व्हिडिओमध्ये दिसणार्‍या वृद्ध महिलेने बस स्टॉपवर आल्यावरच बसमध्ये बसणार आहात का? असे विचारताच सर्व विद्यार्थांनींना राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात वृद्ध महिलेचा अनादर करत असभ्य भाषेचा प्रयोग केला होता. या घटने संबंधित आमच्या कडे अद्याप कोणती ही तक्रार आलेली नाही. याशिवाय या घटनेला कोणतेही सांप्रदायिक रंग नाही. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये “बुरख्याशिवाय बसमध्ये प्रवेश करता येणार नाही.” म्हटले नव्हते. या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थांनी ठराविक बस स्थानकावर बसेस येत नसल्यामुळे जाब विचारण्यासाठी त्यांनी वाटेतच गाडी थांबवली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हिंदू महिलेला बुरखा घालूनच बसमध्ये येण्यास मुस्लिम महिलांनी सक्ती केली का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False