
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये त्याचे उद्घाटन केले. तत्पूर्वी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी या लोकार्पण सोहळ्याचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये भाजप नेत्यांसह महामार्गाचा एक विहंगम फोटोसुद्धा वापरण्यात आला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून तो फोटो खरंच समृद्धी महामार्गाचा आहे का याची विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, पोस्टरमधील महामार्गाचा फोटो थायलंडमधील हायवेचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टरमध्ये 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याची माहिती दिलेली आहे. यामध्ये वेटोळेदार अनेक पदरी महामार्गाचा फोटो दिसतो. हा खरंच समृद्धी महामार्ग आहे का याविषयी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.
नागपूर टुडे, मुंबई लाईव्ह आणि इतर न्युज वेबसाईट्सनीसुद्धा हाच पोटो समृद्धी महामार्गासंबंधीच्या बातम्यांमध्ये वापरलेला आहे.


तथ्य पडताळणी
सदरील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो समृद्धी महामार्गाचा नसल्याचे आढळले. स्टॉक वेबसाईट अॅडोबी येथे हा फोटो थायलंडमधील एका महामार्गाचा असल्याचे सांगितलेले आहे.

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. त्यातून शटरस्टॉक वेबसाईटवर या महामार्गाचा व्हिडिओ आहे. थायलंडमधील हा महामार्ग चिआंग माई शहरातील आहे.
वरील माहितीच्या आधारे शोध घेतल्यावर गुगल मॅप्सवर फोटोतील जागा सापडली.
खाली दिलेल्या मॅपमध्ये आपण तोच महामार्ग अल्याचे पाहू शकतो. हा फोटो थायलंडमधील सिखोई महामार्गाचा आहे.

समृद्धी महामार्ग
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी समृद्धी महामार्गाचे काही फोटो ट्विट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत युट्युब चॅनलवरदेखील या महामार्गाचा व्हिडिओ उपलब्ध आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल पोस्टरमधील फोटो हा समृद्धी महामार्गाचा नसून थायलंडमधील सिखोई महामार्गाचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:थायलंडमधील हायवेचा फोटो समृद्धी महामार्गाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
