Fact Check : हा युवक मुले पळविणारा नाही, त्याच्याकडुन जबरदस्तीने तसे वदवून घेण्यात आले

False सामाजिक

मुले चोरणारी टोळी. व्हिडीओ पहा. अशी माहिती Bhashkar Kedar यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

मुले चोरणारी टोळी चोरण्याची ही घटना नेमकी कुठे घडली, याचा शोध घेण्यापूर्वी आम्ही हा व्हिडिओ नीट ऐकला. त्यावेळी या व्हिडिओतील संभाषण हिंदी भाषेत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा व्हिडिओ उत्तरेकडील एखाद्या राज्यातील असण्याची शक्यता आम्हाला वाटली. आम्ही हिंदीत “बच्चा चोरी के आरोप में बांधकर पीटा” असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात 14 ऑगस्ट 2019 रोजी अमर उजालाने प्रसिध्द केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात हिंदीत देण्यात आलेल्या माहितीच्या स्वैर अनुवादानुसार, एक युवक बसची वाट पाहत असताना अंकित नावाची एक व्यक्ती तिथे आली आणि या युवकावर तो लहान मुले पळविणारा असल्याचा आरोप केला.

Archive  

या व्हिडिओत 31 व्या संकेदाला आपण पाहू शकता की, हा युवक सांगत आहे की तो ऐट नावाच्या ठिकाणी उभा आहे. हे ठिकाण नेमके कुठे आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी हे ठिकाण उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. व्हिडिओत हा युवक अपहरणानंतर चिमुकल्याचे अवयव विकत असल्याचेही सांगत आहे. या घटनेचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने जालौनचे पोलीस अधिक्षक डॉ. सतीश कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेत या युवकाकडून जबरदस्तीने असे वदवून घेण्यात आले. त्याला मारहाण करणाऱ्या लोकांनी त्याला असे बोलण्यास भाग पाडले. या युवकाने कोणत्याही चिमुकल्याचे अपहरण केले नव्हते. व्हिडिओत असणारा युवक त्यावेळी नशेत होता. हा व्हिडिओ जबरदस्तीने बनविण्यात आला. आम्ही या युवकाला मारहाण करुन त्याचा व्हिडिओ बनविणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने आपला गुन्हा कबुल केला आहे.

जालौन पोलिसांनी 14 ऑगस्ट 2019 रोजी ट्विटवर या घटनेची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये काय म्हटले आहे याचा स्वैर अनुवाद खालीलप्रमाणे, डॉ. सतीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एट पोलीस ठाण्याने काही व्यक्तींनी एका युवकाला खांबाला बांधून मारहाण केल्याप्रकरणी आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने आपण लहान मुले पळविणारा असल्याचे वदवून घेत त्याचा व्हिडिओ बनवून तो पसरविल्याप्रकरणी आरोपी अंकित कुमार याला अटक करण्यात आली आहे.

Archive

हेच वृत्त आपण हिंदीतही येथे वाचू शकता.

निष्कर्ष  

या व्हिडिओत हा युवक चिमुकल्याचे अपहरण करत असल्याचा करण्यात आलेला दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळून आला आहे.

Avatar

Title:Fact Check : हा युवक मुले पळविणारा नाही, त्याच्याकडुन जबरदस्तीने तसे वदवून घेण्यात आले

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False