इटलीमध्ये लोकांनी रस्त्यावर नोटा फेकल्या नाहीत. ते व्हेनेझुएलातील जुने फोटो आहेत. वाचा सत्य

Coronavirus False

इटलीमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोविड-19 महारोगामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा सर्वाधिक फटका युरोपातील या ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशाला बसला आहे. त्यामुळे इटलीबद्दल अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. आता अफवा उठली की, इटलीमध्ये लोक रस्त्यावर नोटा फेकून देत आहेत. जे पैसे आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवू शकले नाही, ती धन-दौलत काय कामाची म्हणून तेथील लोक असे करीत असल्याचा मेसेज आणि फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या दाव्याची सत्यता विचारली.

पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

रस्त्यावर नोटांचा खच पडल्याचे विविध फोटो शेयर करून लोक लिहित आहेत की, इटलीमध्ये लोकांनी आपले धन – दौलत अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले. आणि जगाला दाखवून दिले की ही धन – दौलत काय कामाची जे आमचे नातेवाईक – मित्र – मैत्रिणीला वाचवू शकले नाही. धनदांडग्यानो तुम्हाला संधी आहे की , आत्ताच तुमची दौलत गरिबांवर खर्च करा नाहीतर तुमच्यावरसुद्धा तुमची दौलत रस्त्यावर फेकण्याची वेळ येवू नये !

Social-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटो रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे फोटो इटलीमधील नाहीत. तसेच या फोटोंचा कोरोनाशी काही संबंध नाही.

CNW  या शोधपत्रकारितेच्या वेबसाईटने 12 मार्च 2019 रोजी ट्विटरवर वरील फोटो शेयर केल्याचे आढळले. सोबत लिहिले की, व्हेनेझुएला येथील मेरिडा शहरातील बायसेन्टेनेरिओ बँकेवर दरोडा टाकल्यानंतर लुटारूंनी या नोटा रस्त्यावर फेकल्या होत्या. देशाच्या चलनाला आता काहीच किंमत उरली नाही, हे सिद्ध करण्यासाठी चोरांनी असे केले होते.

अर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता Maduradas वेबासाईटवर यासंबंधी 12 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळली. त्यात म्हटले की, व्हेनेझुएलातील मेडिरा शहरातील हे फोटो आहेत. बँक लुटल्यानंतर चोरांना रस्त्यावर या जुन्या चलनी नोटा फेकल्या होत्या. व्हेनेझुएलामध्ये नवीन चलन लागू केल्यानंतर जुने चलन बाद ठरले होते. याच बाद झालेल्या चलनी नोटा रस्त्यावर अशा फेकण्यात आल्या होत्या. याचे अनेक फोटो आपण या बातमीत पाहू शकता.

Venezuela.png

मूळ बातमी येथे वाचा – Maduradasअर्काइव्ह

गेल्या काही वर्षांपासून व्हेनेझुएला हा देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. 2018 साली व्हेनेझुएलाच्या बोलिवर या चलनाची किंमत एका डॉलरला 2 लाख 85 हजार डॉलर इतकी प्रचंड घसरली होती. देशाच्या चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्यानंतर अध्यक्ष निकोलस मदुरो यांनी नवीन चलन बाजारात आणले होते. त्यामुळे जुने चलन बाद ठरले होते.

व्हेनेझुएलामधील विविध पत्रकार आणि वेबसाईट्सने हे फोटो शेयर केले आहेत. ते तम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रस्त्यावर नोटा फेकल्याचे फोटो इटलीमधील नसून ते व्हेनेझुएला देशातील आहेत. गेल्यावर्षी एका बँकेला लुटल्यानंतर चोरांनी बाद झालेल्या नोटा रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. त्यामुळे या फोटोंचा कोरोना व्हायरसशी काही संबंध नाही.

Avatar

Title:इटलीमध्ये लोकांनी रस्त्यावर नोटा फेकल्या नाहीत. ते व्हेनेझुएलातील जुने फोटो आहेत. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False