
केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी अमजद अली आणि तमीम शेख यांना अटक करण्यात आले असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. केरळमधील या घटनेत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे खरे अमजद अली आणि तमीम शेख अशी आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी कोणाला अटक करण्यात आली आहे. याचा शोध घेतला असता द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळावर 5 जून 2020 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार या प्रकरणात विल्सन नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अन्य दोघांची चौकशी करण्यात आली आहे.

त्यानंतर डीडी न्यूज मळ्याळमने 6 जून 2020 रोजी याबाबत केलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटनुसार कोर्टाने अटक केलेल्या एका आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पल्लकड पोलिसांच्या विशेष शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत याप्रकरणात एकाच व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. अमजद अली आणि तमीम शेख नावाच्या कोणत्याही व्यक्तींना अटक करण्यात आलेली नाही. समाजमाध्यमात याबाबत पसरत असलेली माहिती असत्य आहे.
निष्कर्ष
केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी अमजद अली आणि तमीम शेख नावाच्या व्यक्तींना अटक करण्यात आल्याचे असत्य आहे.

Title:केरळमधील हत्तीचे मारेकरी म्हणून चुकीची नावे व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
