नमाजसाठी बंद करण्यात आलेला रस्ता उघडण्यासाठी भाजप आमदाराने हुज्जत घातली नव्हती; वाचा सत्य

False राजकीय

मुंबईत शिवसेनेतर्फे नमाजसाठी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे भाजप आमदार योगेश सागर यांनी पोलिसांशी हुज्जत घालत रस्तावरील बॅरिकेड्स काढले, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की सागर यांची पोलिसांशी हुज्जत नमाजच्या कारणासाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी बाचाबाची झाली होती. 

काय आहे व्हिडिओमध्ये?

भाजप आमदार महेश सागर पोलिसांना रस्ता का बंद केला म्हणून जाब विचारत आहेत. पोलिस त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की, कायदेव्यवस्थेच्या कारणाने त्यांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावले. यावर सागर संतापून बॅरिकेड्सला बाजूला करतात व पोलिसांशी हुज्जत घालतात. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शमध्ये म्हटले की, “कांदिवलीचे विधानसभेचे सदस्य योगेश सागर यांचा नमाज साठी रसता बंद करण्यास शिवसेना सरकारचा जाहिर विरोध. रघुलीला रोड वरील सर्व वाहतुक थांबवुन करदात्यांना आणी रहिवाशांना विनाकारण मनस्ताप !!!”

हिंदी आणि इंग्रजी भाषेतसुद्धा याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यात म्हटले की, “नमाजसाठी शिवसेनेने मुख्य रस्ताच बंद करून वाहतूक अडविली, तीसुद्धा कांदिवली सारख्या हिंदू कॉलनीमध्ये! भाजपचे आमदार योगेश सागर याचा जोरदार विरोध करीत रस्ता खुला केला.”

तथ्य पडताळणी

कीवर्ड्स सर्चद्वारे ‘टीव्ही-9 मराठी’ची 16 फेब्रुवारी 2022 रोजीची बातमी आढळली. काँग्रेस पक्षातर्फे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता. त्यामुळे कांदिवली परिसरात वाहतूक खोळंबल्याने संतापलेल्या भाजप आमदार योगेश सागर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. 

झी-24 तास आणि एबीपी माझा यांनीसुद्धा या प्रकरणी बातमी केली होती. एकाही बातमीमध्ये नमाजसाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे म्हटलेले नाही. 

व्हायरल होत असलेली क्लिप मुंबई भाजपच्या ट्विटर अकाउंटवरूनदेखील पोस्ट करण्यात आला होता. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरासमोर काँग्रेस मुंबईने आंदोलन करण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांचा गैरवापर करत वेठीस धरले. याविरोधात चारकोपचे आमदार योगेश सागर यांनी आवाज उठवला व जनतेला न्याय मिळवून दिला.

भाजपतर्फेसुद्धा नमाजसाठी रस्ता बंद करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 

फॅक्ट क्रेसेंडोने योगेश सागर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दावा सत्य नसल्याचे सांगितले. 

“खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यामुळे पोलिसांनी रस्ता बंद केला. त्यामुळे लोकांना अडचणी होत होती. मी पोलिसांना विनंती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी बॅरिकेड्स काढायला सांगतले. यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह पसरविला जात आहे. नमाजसाठी तो रस्ता बंद करण्यात आला नव्हता,” असे सागर यांनी सांगितले. 

सागर यांनी त्यांच्या फेसबुकवरदेखील हा व्हिडिओ पोस्ट करून म्हटले की, ” खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरा जवळ काँग्रेसचा मोर्चा येणाऱ्या दिवशी नागरिकांच्या सोयीला घेऊन मी काही मुद्दे पोलिसांसमोर उभे केले, आणि परस्पर झालेला विवाद त्याचा हा विडिओ आहे. काही लोकांनी या व्हिडिओला काही पक्षांशी व नमाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. खोटं पसरवून अराजकता निर्माण करणाऱ्या या सर्व लोकांचे मी निषेध करतो!”

सागर यांनी सायबर पोलिसांकडे या प्रकरणी तक्रारदेखील दाखल केली आहे.

Original Post – Facebook

कांदिवली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर जाधव यांनीसुद्धा फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, नमाजसाठी रस्ता बंद करण्यात आला नव्हता. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यामुळे  खबरदारी म्हणून रस्ता बंद करण्यात आला होता.

आंदोलन कशामुळे करण्यात आले होते?

देशभरात करोना विषाणू पसरवण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी मोफत तिकीट देऊन भाग पाडले, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता. 

महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी पंतप्रधानांच्या या टीकेला उत्तर दिले होते. याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेसने भाजपच्या विविध नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 16 फेब्रुवारीला कांदिवली येथे गोपाळ शेट्टी यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की आमदार योगेश सागर यांचा पोलिसांशी हुज्जत घालण्याचा व्हिडिओ चुकीच्या सांप्रदायिक दाव्यासह पसरविला जात आहे. नमाजसाठी कांदिवलीमध्ये रस्ता बंद करण्यात आला नव्हता. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावले होते. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नमाजसाठी बंद करण्यात आलेला रस्ता उघडण्यासाठी भाजप आमदाराने हुज्जत घातली नव्हती; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False