मुस्लिम प्रेयसीच्या दबावाखाली ए. आर. रेहमान यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का?

False सामाजिक

“मद्रासचा मोझार्ट” म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान याने मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडून दबावापोटी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. प्रेयसीने धर्म बदलण्यास दबाव टाकल्यानेच मूळ “दिलीप कुमार” वयाच्या 23व्या वर्षी अल्लाहरखा रेहमान झाला. एवढेच नाही तर त्यांनी संपूर्ण कुटुंबाचेसुद्धा धर्म परिवर्तन केले. आता परिस्थिती अशी आहे की, कपाळावर गंध लावलेला असेल तर त्या गीतकाराला रेहमानच्या घरात प्रवेश मिळत नाही, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

ए. आर रहमान उर्फ दिलीप कुमार 23 वर्ष का था जब उसकी मुस्लिम प्रेमिका ने उसके संग रहने के लिए उसके समक्ष हिन्दू धर्म त्यागकर इस्लाम स्वीकारने की शर्त रखी थी. दिलीप कुमार ने अपनी प्रेमिका के लिए अपना धर्म त्याग दिया और इस्लाम कुबूल कर बन गया अल्ला रक्खा रहमान यानी ए. आर रहमान, और अपनी शांतिदूत प्रेमिका से निकाह किया, उसके बाद दिलीप कुमार ने अपने पूरे हिन्दू परिवार को भी इस्लाम कुबूल करवाया.

तथ्य पडताळणी

दोन ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार प्राप्त संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दिलेल्या विविध मुलाखती आणि त्यांच्याविषयी केलेले लिखाण तपासले असता पोस्टमधील दाव्याहून निराळेच तथ्य समोर येते. रोलिंग स्टोन या जगप्रसिद्ध मॅगझीनला 2008 साली दिलेल्या मुलाखतीमध्ये रेहमान यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला याचे सविस्तर विवेचन दिले आहे.

रेहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर मोठ्या कष्टाने त्यांच्या आईने कुटुंबाचा गाडा चालविला. रेहमान यांना लहान वयातच काम सुरू करावे लागले. याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. 1988 साली त्यांची एक बहिण गंभीर आजारी पडली. अनेक उपचार घेऊनही ती बरी होत नव्हती. हवन-यज्ञ यासारखे उपाय करून पाहिले तरी तिच्या तब्येतीमध्ये सुधार होण्याऐवजी ती आणखीच खालावत होती. सगळी आशा सोडल्यानंतर शेख अब्दुल कादीर जीलानी (पीर कादरी) या सुफी संतांना ते भेटले. आश्चर्य म्हणजे यानंतर त्यांची बहिण ठणठणीत बरी झाली. याप्रसंगानंतर रेहमान यांचा इस्लाम धर्माकडे कल वाढला आणि 1991 साली रेहमान यांनी कुटुंबासह इस्लाम धर्म स्वीकारला.

मूळ लेख येथे वाचा – रोलिंग स्टोन मॅगझीनअर्काइव्ह

रेहमान यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव होता का?

स्क्रोल वेबसाईटवर नसरीन मुन्नी कबीर लिखित “AR Rahman: The Spirit of Music”  (2015) या पुस्तकातील संपादित अंश प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये रेहमान यांना पीर बाबांच्या दबावाखाली त्यांनी धर्म बदलला का? असा थेट प्रश्न केला होता. त्याचे उत्तर देताना रेहमानने सांगितले की, इस्लाम धर्म स्वीकारण्याचा माझ्यावर कोणताच दबाव नव्हता. असं बळजबरी करून धर्म स्वीकारताच येत नाही. जेव्हा तुमच्या आतून तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हाच असा निर्णय घेतला. सुफी तत्वज्ञानाने मला मनःशांती मिळवून दिली. माझ्या कुटुंबाला आध्यात्मिक अनुष्ठान प्राप्त करून दिली. हिंदु असलेली माझी आई आधीपासूनच खूप आध्यात्मिक होती. पीर कादरी यांनी आम्हाला धर्म बदलण्यास सांगितले नव्हते.

मूळ लेख येथे वाचा – स्क्रोल

याच पुस्तकात दिलीप कुमार हे नाव बदलून ए. आर. रेहमान हे नाव स्वीकारण्याचासुद्धा किस्सा दिला आहे. रेहमान यांना त्यांचे दिलीप कुमार नाव आवडत नव्हते. त्यांच्या डोक्यात जी स्वतःची प्रतिमा होती, तिला हे नाव साजेसे नसल्याचे त्यांना वाटायचे. म्हणून ते नाव बदलून नवी सुरुवात करण्याच्या विचारत होते. इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी रेहमानची आई बहिणीच्या लग्नासाठी एका ज्योतिषाकडे गेली होती. त्या ज्योतिषाने रेहमान यांना पाहताच हा मुलगा विशेष असल्याचे सांगितले. या हिंदु ज्योतिषानेच त्यांना “अब्दुल रेहमान” आणि “अब्दुल रहिम”  असे नाव ठेवण्याचे सुचविले. नंतर त्यांच्या आईने अल्लारखा हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.

रेहमान यांची प्रेयसी कोण होती?

कृष्णा त्रिलोक लिखित “Notes of a Dream  या अधिकृत चरित्रात रेहमान यांचे अरेंज मॅरेज झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो आहे. रेहमानच्या आईने सुफी मंदिरात सायरा यांना सर्वप्रथम पाहिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच ते सायरा यांना भेटले होते. सायरा या कच्छ भाषिक कुटुंबातील आहेत.

मूळ लेख येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

अमेरिकेतील सीएनएन चॅनेलने 2009 साली रेहमान यांची मुलाखत घेतली होती. ती तुम्ही खाली पाहू शकता. 4.29 मिनिटांपासून रेहमान त्यांनी इस्लाम धर्म का स्वीकारला याबद्दल स्वतः सांगत आहे. वडील गेल्यानंतर त्यांना एकटे पडल्यासारखे वाटत होते. या खडतर काळात सुफी तत्वज्ञानाने त्यांना आधार दिला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे ते हळूहळू इस्लाम धर्माकडे वळाले.

निष्कर्ष

ए. आर. रेहमान यांनी मुस्लिम प्रेयसीच्या दबावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला नव्हता. पीर कादरी या सुफी संताच्या सहवासात आल्यावर सुफी तत्वज्ञानाकडे आकर्षित होऊन रेहमान यांनी कुटुंबासह 1991 साली इस्लाम धर्म स्वीकारला होता. यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांनी स्वतःच्या मर्जीने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:मुस्लिम प्रेयसीच्या दबावाखाली ए. आर. रेहमान यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False