
एका अल्पवयीन मुलाने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सीएए-एनआरसीच्या विरोधातील आंदोलनकर्त्यांवर 30 जानेवारी रोजी गोळी चालविली होती. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. मीडिया आणि पोलिसांच्या समक्ष झालेल्या या घटनेचे व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने पसरले. अशाच काही फोटोंमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातपाशी लाल रंगाची एक बॉटल दिसते. या फोटोंवरून दावा केला जात आहे की, या विद्यार्थ्यांने गोळी लागून जखमी झाल्याचा बनाव केला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता तो खोटा आढळला.
काय आहे पोस्टमध्ये?
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
30 जानेवारी रोजी झालेल्या या गोळीबारीच्या सर्व बातम्यांमध्ये शाहदाब फारूख नावाचा विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. पोस्टमध्ये शेयर केलेल्या फोटोमध्ये तो दिसत आहे. जामिया विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाहदाब हा मास कम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी आहे. जखमी झाल्यानंतर त्याला आधी होली फॅमिली रुग्णालयात आणि नंतर ‘एम्स’मध्ये भरती करण्यात आले.
मूळ बातमी येथे वाचा – न्यू इंडियन एक्सप्रेस । अर्काइव्ह
गोळीबार झाला तेव्हा माध्यामांचे अनेक छायाचित्रकार तेथे उपस्थित होते. त्यामुळे या घटनेचे अनेक फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सदरील जखमी विद्यार्थ्याला दवाखान्यात नेतानाचे वेगवेगळ्या बाजुंनी घेतलेले फोटो पाहिले असता कळते की, ती लाल रंगाची पाण्याची बॉटल आहे. प्रा. अली खान मुहमदाबाद यांनी ट्विटर वर असाच एक फोटो शेयर करून शंकाउपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिले होते.
नीट लक्ष देऊन पाहिले असता कळते की, या जखमी विद्यार्थ्याला मदत करणाऱ्या मुलीच्या हातात ही लाल रंगाची बॉटल आहे. फॅक्ट क्रेसेंडोने जामिया विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अझीम यांच्या संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “शाहदाब फारूख असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, गोळी लागल्यामुळे त्याच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. तो नाटक करीत नसून, तशा अफवा पसरवू नये. सध्या तो जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या घरी आराम करीत आहे.”
तसेच त्यांनी या फोटोत शाहदाबला मदत करणाऱ्या मुलीचे नाव मिदात समरा असल्याचे सांगितले. त्यानुसार, फॅक्ट क्रेसेंडोने या समराशी संपर्क केला. तिने फॅक्ट क्रेसेंडोला तिच्याकडी लाल बॉटलचे फोटो पाठवले. यावरून हे स्पष्ट होते की, ही काही लाल रक्ताची बॉटल नाही किंवा केच-अपचीसुद्धा बॉटल नाही. या सगळ्या अफवा असल्याचे तिने सांगितले.
ऑल्ट न्यूजने यापूर्वी याची पडताळणी केलेली आहे.
जेएनयूची स्टुडेंट युनियन अध्यक्षा आईशी घोष हिच्याविषयी देखील मारहाणीत हात मोडल्याचा बनाव केल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोने हा दावा सप्रमाण खोटा असल्याचे सिद्ध केले होते. त्याविषयी येथे वाचा.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अल्पवयीन मुलाने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी खरंच जखमी झाला होता. त्याने गोळी लागल्याचा बनाव केला नव्हता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमधील लाल रंगाची बॉटल रक्ताची नसून, पाण्याची आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.

Title:जामियातील ‘त्या’ विद्यार्थ्याला खरंच गोळी लागली आहे. ती लाल बॉटल पाण्याची होती. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
