FAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य

False सामाजिक

विनायक दामोदर सावरकर अंदमान तुरुंगामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना चित्रित करण्यात आलेला दुर्मिळ व्हिडिओ म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रफितीमध्ये सावरकरांच्या अंदमान जेलमधील परिस्थीतीवर भाष्य करण्यात आलेले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका माहितीपटाचा आहे. सावरकारांचा तो खराखुरा व्हिडिओ नाही.

काय आहे दावा?

दीड मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये सावरकर अंदमान जेलमध्ये कसे राहायचे, त्यांना कशी कठोर शिक्षा केली जायची आदींविषयी इंग्रजीतून वर्णन केलेले आहे. कथानकसह जेलमधील कथित चित्रणदेखील दिसते.

या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला आहे की, ‘स्वा. सावरकर अंदमानात असतांना एका ब्रिटिश पत्रकाराने चित्रित केलेला व ‘बीबीसी’ने प्रसारित केलेला हा दुर्लभ व्हिडिओ खास स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींसाठी.’

मूळ व्हिडिओ – फेसबुक । अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम बीबीसीने असा काही व्हिडिओ प्रसारित केला का याचा शोध घेतला. परंतु, बीबीसीने असा कोणतीही व्हिडिओ किंवा रिपोर्ट प्रसिद्ध केल्याचे आढळले नाही. 

कीवर्ड्सच्य साहाय्याने शोध घेतल्यावर केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या युट्यूब अकाउंटवर ‘Life of Shri Vinayak Damodar Savarkar’ नावाचा एक माहितीपट आढळला. सावरकरांच्या जीवनातील कार्याची आणि टप्प्यांची यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. 

सावरकर यांच्या जीवनावरील माहितीपटातील काही भाग कट करून सध्या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये वापरलेले आहेत. वरील व्हिडिओच्या 25.08 मिनिटांपासून तुम्ही व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकता.

याविषयी अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, भारत सरकारच्या फिल्म डिव्हिजनतर्फे सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1983 साली हा माहितीपट तयार करण्यात आला होता. प्रेम वैद्य ही डॉक्युमेंटरी दिग्दर्शित केली होती. फिल्म डिव्हिजनच्या वेबसाईटवर सावरकरांवरील माहितीपटाची नोंद उपलब्ध आहे. 

सावरकर यांचा जन्म नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी 28 मे 1883 साली झाली होता. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा खून आणि इतर आरोपांखाली त्यांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 


ALSO READ:

‘जायंट मून’चा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही

रशियाने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटलेले नाही


सावरकरांना अंदमानात 4 जुलै 1911 रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली. 1921 मध्ये त्यांची अंदमानातून रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांचे 26 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबईत निधन झाले. (माहिती स्रोत – मराठी विश्वकोश)

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सावरकरांचा हा खरा व्हिडिओ नाही. त्यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने 1983 साली तयार केलेल्या माहितीपटातील ही क्लिप आहे. चुकीच्या दाव्यासह ती व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False