कतारमधील स्टेडियमचा फोटो संघाने उभारलेले कोविड सेंटर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

एका भव्य वास्तूचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) उभारलेल्या 6000 बेड क्षमतेच्या कोविड सेंटरचा हा फोटो आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो भारतातील नसून कतार देशातील स्टेडियमचा आहे. 

काय आहे दावा? 

खाली दिलेला फोटो शेअर करून सोबत म्हटले की, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात भव्य कोविड सेंटरचा हा फोटो आहे. संघाने इंदूरमध्ये हे उभारले आहे. 45 एकर जागेत पसरलेल्या या सेंटरमध्ये 6000 बेड्स आणि 4 ऑक्सिजन प्लांटची सुविधा आहे. 

फेसबुक । आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

सदरील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो कतार देशातील फुटबॉल स्टेडियमचा आहे.

मिडल इस्ट मॉनिटर या वेबसाईटवरील माहितीनुसार, 2022 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी हे स्टेडियम तयार करण्यात आले आहे. कतारमधील अल खोर शहरात उभारण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये 60 हजार प्रेक्षक सामना बघू शकतात. 

फिफाच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील या स्टेडियमची माहिती व फोटो उपलब्ध आहेत. अल बयात असे या स्टेडियमचे नाव आहे. तंबूसारख्या आकाराचे हे स्टेडियम कतारच्या पारंपारिक धारणांनुसार तयार करण्यात आले आहे. 

गेटी इमेज या वृत्तफोटो संस्थेच्या वेबसाईटवर या स्टेडियमची अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत. ती तुम्ही खाली पाहू शकता. या स्टेडियमला तुम्ही गुगल मॅपवरदेखील भेट देऊ शकता.

Embed from Getty Images

हे तर कळाले की, हा फोटो इंदूरमधील कोविड सेंटरचा नाही.

मग इंदूरमध्ये संघातर्फे 6000 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले का?

ANI वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार इंदूरमधील खांडवा रोडवर राधास्वामी सत्संग भवनावर अहिल्या कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याची क्षमता 600 बेडची असून, भविष्यात सहा हजार बेड सुरू करण्याचा मानस आहे. 

बातमीमध्ये राज्यमंत्री तुलसी सिलावट यांनी माहिती दिली की, विविध सामाजिक संस्था, उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी हे कोविड केंद्र सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली. 

संघाने हे केंद्र उभारले असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ संघाचे स्वयंसेवक या केंद्रात मदतीला असतील एवढेच लिहिलेले आहे.

राधा स्वामी सत्संग संस्थेच्या सहयोगाने इंदूर जिल्हा प्रशासनातर्फे हे कोविड केंद्र उभारण्यात आले आहे. इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कोविड केंद्राचे फोटो शेअर केले आहेत.

ऑल्ट न्यूजशी बोलताना मध्य प्रदेशच्या कोविड सल्लागार समितीचे सदस्य डॉ. निशिकांत खरे यांनी सांगितले की, इंदूरमधील कोविड केंद्र संघाने बांधले हा दावा पूर्णतः निराधार आहे. 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, सदरील फोटो इंदूरमधील कोविड केंद्राचा नाही. हा फोटो कतारमधील फुटबॉल स्टेडियमचा आहे. तसेच इंदूरमध्ये जिल्हा प्रशासनाने सेवाभावी संस्थांच्या मदतीने 600 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. ते संघाने बांधलेले नाही.

Avatar

Title:कतारमधील स्टेडियमचा फोटो संघाने उभारलेले कोविड सेंटर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False